देशात खरीप पेरणीला वेग 

यंदाच्या खरीप हंगामात परेणीने जोर धरला आहे. देशात आत्तापर्यंत खरिपाची ४३३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात २३० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता.
rice planting
rice planting

नवी दिल्ली: यंदाच्या खरीप हंगामात परेणीने जोर धरला आहे. देशात आत्तापर्यंत खरिपाची ४३३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात २३० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. यंदा आत्तापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेत ८८ टक्के अधिक पेरा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पेरणी अहवालातून मिळाली.  भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत देशात सरासरी १९१.६ मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, यंदा २१३.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. २९ हवामान उपविभागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर ७ उपविभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.  देशातील अनेक भागांत मॉन्सून सक्रीय झाल्याने पेरणीयोग्य पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकत्या घेतल्या. ताग वगळता खरिपातील इतर सर्व पिकांचा पेरा गेल्यावर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत वाढला आहे. ‘‘खरिपातील पिके ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. यंदा देशात मॉन्सूनने साधारण वेळेच्या आधीच प्रवेश करत देश व्यापला. तसेच मॉन्सूनचा पाऊसही अनेक भागांत चांगला झाला. त्यामुळे भातासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाचीही लागवड जास्त झाली,’’ असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.  खरिपातील धान्यामध्ये सर्वाधिक लागवड होणाऱ्या भाताची लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत ३८ टक्क्यांनी वाढली आहे. भाताची लागवड ६८.१ लाख हेक्टरवर झाली आहे. तर, उसाचे क्षेत्र यंदा १.५ टक्क्यांनी वाढून ५०.६ लाख हेक्टरवर लागवड झाली. तर, पोषक वातावरणामुळे कापसाची लागवड जवळपास दुपटीने झाली आहे. भरडधान्यांची ७०.७ लाख हेक्टरवर झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट पेरा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात ३५.२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा मका लागवड मोठी वाढ झाल्याने भरडधान्याचे क्षेत्र वाढले आहे.  खरीप पेरा दृष्टिक्षेपात 

  • गेल्यावर्षीच्या तुलनेत ८८ टक्के अधिक लागवड 
  • कडधान्याचे क्षेत्र तीन पटीने वाढले 
  • भाताखाली आत्तापर्यंत ६८.१ लाख हेक्टर क्षेत्र 
  • ऊस लागवड ५०.६ लाख हेक्टरवर पोचली 
  • भरडधान्याची ७०.७ लाख हेक्टरवर पेरणी 
  • तूर लागवडीत पाच पटीने वाढ 
  • तेलबिया पिकांची १०९ लाख हेक्टरवर पेरणी 
  • कडधान्य, तेलबिया पेरणीत मोठी वाढ  यंदा कडधान्य आणि तेलबिया पिकांची पेरणी वाढली आहे. कडधान्याचा पेरा २९० टक्क्यांनी वाढून ३६.८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. तर तेलबिया पिकांची पेरणी २२५ टक्के वाढली असून १०९ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. भुईमूग आणि सोयाबीनचे क्षेत्र यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे एकूण तेलबिया पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली. 

    देशातील पीकनिहाय पेरणी (लाख हेक्टरमध्ये) 

    पीक २०२०-२१ २०१९-२० बदल 
    भात ६८.०८ ४९.२३ ३८.३ 
    तूर १६.५६ २.७९ ४९३ 
    उडिद ८.७७ १.८७ ३६९ 
    मूग ९.४० ३.१४ १९९.४ 
    इतर कडधान्य २.०७ १.६६ २४.७ 
    एकूण कडधान्य ३६.८२ ९.४६ २८९.२
    ज्वारी ४.५५ १.७० १६७.६ 
    बाजरी १७.९० ७.८५ १२८.० 
    मका ४५.५८ २३.२७ ९५.९
    छोटी तृणधान्य १.३१ १.१३ १५.९ 
    रागी १.३५ १.२५ ८.० 
    एकूण भरडधान्य ७०.६९ ३५.२० १००.८ 
    भुईमूग २५.०५ १५.५८ ६०.८ 
    सोयाबीन ८१.८१ १६.४३ ३९७.९ 
    सुर्यफूल ०.३६ ०.२५ ४४.० 
    तीळ १.७५ १.१८ ४८.३ 
    एकूण तेलबिया १०९.२० ३३.६३ २२४.७ 
    ऊस ५०.६२ ४९.८६ १.५ 
    ताग ५.८९ ६.८० (-)१३.४ 
    कापूस ९१.६७ ४५.८५ ९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com