खरिपावर दुष्काळाचे सावट गडद

सुरवातीला थोडा पाऊस झाल्यानंतर परत पाऊस येईल, या आशेवर लागवडी केल्या. परंतु, पंधरवडा लोटूनही पावसाचा थेंब नसल्यानं उगवलेली पिकं वाळून चालली आहेत. हलक्‍या रानात पेरलेलं उगवलं. परंतु, भारी रानात तर अनेक ठिकाणी पेरलेलं काही उगवलंच नाही. - दीपक जोशी, शेतकरी, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.
दुष्काळ
दुष्काळ

पुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत. मराठवाड्यातील अनेक गावांत तर उन्हाळा मोडलेलाच नाही. पिण्याचे टॅंकर जुलैच्या मध्यातही सुरूच आहेत. या अस्मानी आपत्तीबरोबरच शेतकऱ्यांना पीककर्ज, विमा परतावा, कर्जमाफीतील गोंधळ अशा सुलतानी संकटांनाही सामोरे जावे लागत आहे.  मराठवाड्यात ५३ टक्के पाऊस मराठवाड्यात १ जून ते १४ जुलै यादरम्यान अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५३.५ टक्के पाऊस झाला. गतवर्षी याच काळात सरासरी १०२.४ टक्के पाऊस झाला होता. मराठवाड्यात यंदा खरिपाच्या सर्वसाधारण ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत २४ लाख ३१ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ४८.६६ टक्‍के पेरणी उरकलेले क्षेत्र आहे. अनेक मंडळांमध्ये शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊसच झाला नसल्याने पेरणीच झाली नाही. परभणी जिल्ह्यात कपाशीची उगवण व्यवस्थित न झाल्यामुळे दुबार-तिबार लागवड करावी लागली. परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत दोनशेहून अधिक टॅंकर सुरू आहेत. नागपूर विभागात पिकांची वाढ खुंटली नागपूर विभागात केवळ ३९.६३ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली. उर्वरित क्षेत्रावर अद्यापही पेरणी झाली नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाने आठवडाभरापासून दडी मारल्याने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापसाची वाढ खुंटली आहे. धानाच्या रोवणीचे कामही यामुळे प्रभावित झाल्याने त्याचा थेट उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.  वऱ्हाडात असमतोल पाऊस वऱ्हाडात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजवर झालेला पाऊस असमतोल असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने बुलडाण्यात समाधानकारक पाऊस झालेला असतानाच अकोला, वाशीम पिछाडीवर आहेत. अकोल्यात सरासरीच्या २३.८५ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात १९.९५ टक्के पाऊस झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्यांना सुरवात झाली. जुलै महिना निम्मा संपला, तरी पावसाचा जोर वाढू शकलेला नाही.   खानदेशात १७ ते २४ टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या २० टक्के, धुळ्यात १७ टक्के आणि नंदुरबारात २४ टक्के पाऊस झाला आहे. यंदा जूनमध्ये फक्त तीन दिवस पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाचे पाच दिवस आहेत. खानदेशात एकूण १५ लाख हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील २५ टक्के क्षेत्र नापेर आहे. पूर्वहंगामी कापसाची सुमारे दीड लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे. या कापसासह कोरडवाहू कापसाची मिळून आठ लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे. पिकांची उगवण बऱ्यापैकी आहे. परंतु, पावसाची गरज सर्वत्र आहे. सातपुडा पर्वतालगतची कांदा व केळीची लागवड थांबली आहे. गिरणाकाठच्या सुमारे १००० हेक्‍टरवरील लिंबू व मोसंबीच्या बागांना पावसाची नितांत गरज आहे.  सांगली, नगरला दुबार पेरणीचे संकट सांगली जिल्ह्यात एक लाख ६६ हजार हेक्टरवर पेरणी झाली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर या तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले. नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३५.६२ टक्के पेरणी झाली आहे. गेल्या काही दिवसांत ज्या भागात पेरणी झाली, तेथेही पाऊस गायब झाला असून, सध्या फक्त सोसाट्याचा वारा वाहतो आहे. त्यामुळे उगवलेले कोंब सुकू लागले आहेत. अजून काही दिवस पाऊस आला नाही, तर दुबार पेरणीचे संकट उद्भवणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभराच्या तुलनेत अजूनही श्रीरामपूर, नगर, शेवगाव, कर्जत या चार तालुक्यांत पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यात मागील सप्ताहापर्यंत अवघे ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांत अत्यल्प पेरणी झाली आहे. सोलापूर कोरडाच; पुण्यात असमान पाऊस सोलापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने अधूनमधून पडलेल्या जेमतेम पावसावर अवघ्या ३७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदाही तूर, मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी बऱ्यापैकी क्षेत्रावर झाली आहे. पण, त्या पावसाअभावी तग धरू शकतील की नाही, याबाबत साशंकता आहे. जिल्ह्यात केवळ ३९ टक्के असमान पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील दौंड, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती या तालुक्यांत ५० टक्केही पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे. यामुळे या भागातील पिके अडचणीत आली आहेत. तर, अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरण्या केलेल्या नाहीत. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत चांगला पाऊस झाला आहे. संकटांचा डोंगर

  •  मराठवाड्यात एकाही जिल्ह्यात सरासरीइतका पाऊस नाही
  •  ओलावा नसल्यामुळे उगवू लागलेली पिके करपू लागली 
  •  मका पिकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नवे संकट
  •  अनेक ठिकाणी सोयाबीनवर गोगलगायींचा हल्ला 
  •  नागपूर विभागात साडेतीन हजार हेक्‍टरवरील बागा जळाल्या 
  •  खानदेशात सुमारे २५ टक्के क्षेत्र नापेर
  •  पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी टापूतही गंभीर स्थिती
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com