किसान मोर्चाची आज विधान भवनावर धडक

किसान मोर्चाची आज विधान भवनावर धडक
किसान मोर्चाची आज विधान भवनावर धडक

मुंबई : शेती, शेतकरी, वनजमिनी, आदिवासी शेतकरी यांच्या विविध मागण्यांसदर्भात नाशिक येथून निघालेला किसान सभेचा महामोर्चा रविवारी (ता. ११) मुंबईत धडकला. मोर्चाची व्याप्ती आणि मिळणारा पाठिंबा पाहून हादरलेल्या राज्य सरकारने तत्काळ चर्चेचा प्रस्ताव देऊन धार कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीकडे चर्चा अाणि दुसरीकडे आंदोलन अशी भूमिका घेतलेल्या नेत्यांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. हजारो शेतकऱ्यांचा हुंकार राजधानीत पोचताच राजकीय घडामोडींना वेग आला. मोर्चा आज (सोमवारी) विधान भवनावर धडक देणार आहे.  दरम्यान, सरकारतर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (ता. ११) मोर्चेकऱ्यांची विक्रोळी येथे भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्रालयात चर्चेचे निमंत्रणही दिले. मोर्चेकरांचे शिष्टमंडळ या चर्चेला जाणार असून, यात अजित नवले यांचा समावेश नसावा, असा प्रयत्न सरकार करत असल्याच्या वृत्ताने रविवारी वातावरण चांगलेच तापले होते. लेखी आश्वासना दिल्याशिवाय माघार घेणार नाही, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत विधान भवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला आहे. लेखी आश्वासनाच्या मागणीवर चर्चा करण्यात येऊन आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास जलसंपदामंत्री महाजनांनी व्यक्त केला. सुमारे चाळीस हजार शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चात सहभागी झाले आहेत. आज यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याने या सरकारचा निषेध करणयासाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी व किसान सभेने मोर्चा काढला आहे. ठाण्यातून हा मोर्चा आता मुंबईत पोचला असून, सायन येथील सोमय्या मैदानावर हा मोर्चा थांबून, रात्री हा मोर्चा आझाद मैदानावर पोचणार होता. या मोर्चात विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार असून, शिवसेना, मनसे, शेकाप, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्यावी, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वन हक्‍क कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, अशा मागण्या किसान मोर्चाच्या आहेत. मोर्चा ठाण्यात आल्यावर शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे मोर्चाला सामोरे गेले. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेदेखील विक्रोळी येथे मार्चात सामील झाले. शेकपाचे जयंत पाटील अनेक दिवसांपासून मोर्चासोबत आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्रयांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्याची घोषणा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी केली आहे. यामुळे सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उद्या या मोर्चात सामील होणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाला पाठिंबा दिला असून, सांयकाळी सायनच्या सोमय्या मैदानात जावून मोर्चेकऱ्यांशी ठाकरे यांनी संवाद साधला.      दरम्यान, बुलडाणा येथे असलेल्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना सरकारने तत्काळ मुंबईत पाचारण केले आहे.  शेतकऱ्यांच्या मोर्चाला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा मनापासून पाठिंबा आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे हे आंदोलनात सहभागी होणार आहेत.  - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक-मुंबई किसान लॉँग मार्चला कॉँग्रेसचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकार विरोधातील या संघर्षात कॉँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व मागण्या मान्य कराव्यात.  - अशोक चव्हाण, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना पक्षाचा पाठिंबा - धनंजय शिंदे,  आम आदमी पक्ष, महाराष्ट्र सरकारच्या चर्चेचे आम्ही स्वागतच करतो, मात्र दुसरीकडे मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरू ठेवणार आहोत. आम्हाला लिखित आश्‍वासन हवे आहे. विश्‍वासघात होऊ नये अशी अाशा आहे.   - अजित नवले, सचिव, किसान सभा शेतकऱ्यांच्या पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार.  - जयंत पाटील, आमदार व नेते, शेकाप शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांसोबत आहे. - एकनाथ शिंदे, शिवसेना नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, मागण्या घेऊनच जाऊ. - जीवा पांडू गावित, शेतकरी नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com