किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा 

अखिल भारतीय किसान संघर्ष शेतकरी समन्वय समिती व इतर संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
farmer agitation
farmer agitation

नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करत कायदे रद्द करावेत या मागणीसाठी अकोले (जि. नगर) येथे अखिल भारतीय किसान संघर्ष शेतकरी समन्वय समिती व इतर संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकरी, कामगार, महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या वेळी शेतकऱ्यांच्या शेतातील माल तहसील कार्यालयासमोर टाकला.  दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारने विरोध करत दडपशाही केल्याचा आरोप करत राज्यात गुरुवारी (ता. ३) अखिल भारतीय किसान संघर्ष शेतकरी समन्वय समिती व इतर संघटनांच्या वतीने आंदोलन पुकारले. अकोले (जि. नगर) येथे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार डॉ. किरण लहामटे, सुरेश नवले, डॉ. संदीप कडलग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, दादा पाटील वाकचौरे, कारभारी उगले, प्रदीप हासे, नानासाहेब दळवी, रामहारी तिकांडे, बाळासाहेब नाईकवाडी, सोमनाथ नवले, राजू कुमकर, मच्छिंद्र धुमाळ, सुनील पुंडे, सुरेश साबळे, स्वप्निल नवले, योगेश राक्षे, नामदेव भांगरे आदींसह शेतकरी, महिला, मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सुरेश नवले यांच्या शेतातील माल तहसील कार्यालयाच्या दारात ओतला. लुटता कशाला फुकटच न्या अशी भावना या वेळी व्यक्त केली. हा शेतीमाल मंत्र्यांना पोचवा असे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना सांगितले.

कृषी क्षेत्र कार्पोरेट घराण्यांना द्यायचेय ः डॉ. अजित नवले   किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले, की केंद्र सरकार शेतकऱ्यांसंबंधी तीन कायदे आणत असताना शेतकऱ्यांच्या हातातील बेड्या तोडण्याची भाषा करत आहे. मात्र कायदा व्यवस्थित वाचल्यावर असे लक्षात येते, की या कायद्याच्या आडून शेतकऱ्यांना हमीदराचे मिळणारे संरक्षण ते संपवायचे आहे, बाजार समित्या संपवायच्या आहेत आणि संपूर्ण कृषी क्षेत्र कार्पोरेट घराण्यांच्या हवाली करायचे आहे. त्याला विरोध म्हणूनच शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं तळतळाट व्यक्त करत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com