समस्यायुक्त जमिनींचे गुणधर्म जाणून करा वेळीच उपाययोजना

अलिकडे खत आणि पाणी यांच्या अतिरीक्त वापरासह अन्य अयोग्य व्यवस्थापनामुळे जमिनींच्या समस्या वाढत चालल्या आहेत. जमिनीच्या समस्या जाणून घेऊन, वेळीच उपाययोजना केल्यास पिकांच्या उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम रोखता येतो.
Cultivation of greenery crops is beneficial for maintaining soil fertility
Cultivation of greenery crops is beneficial for maintaining soil fertility

अलिकडे खत आणि पाणी यांच्या अतिरीक्त वापरासह अन्य अयोग्य व्यवस्थापनामुळे जमिनींच्या समस्या वाढत चालल्या आहेत. जमिनीच्या समस्या जाणून घेऊन, वेळीच उपाययोजना केल्यास पिकांच्या उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम रोखता येतो. जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊन, त्यांच्या सुपीकतेवर परिणाम होतो. अशा नेमक्या समस्या कोणत्या ते प्रथम पाहू.

  • जमिनीचा सामू ४.५ पेक्षा कमी किंवा ८.५ पेक्षा जास्त होणे.
  • क्षाराचे प्रमाण वाढणे ः जास्त पाणी दिल्यानंतर बाष्पीभवनानंतर पाणी उडून जाते. मात्र, पाण्यातील क्षार तसेच राहून वाढत जातात. मातीत वाढतात. ते मातीचे रंध्र (मानवी भाषेत नाक) बंद करतात.
  • जमीन पांढरट व कडक होणे ः मातीमध्ये ओलावा आणि हवेचे योग्य प्रमाणात मिश्रण असले पाहिजे. अतिरीक्त पाणी दिल्याने मातीतील हवा निघून जाते. माती कडक होते. हवेच्या अभावामुळे मातीत जगणाऱ्या जिवाणू, गांडूळ आणि इतर सजीवांना श्वासोच्छ्वास करता येत नाही. अशा मातीत गांडूळ व जिवाणूंची संख्या घटते. परिणामी जमिनीतील पालापाचोळा कुजण्याची प्रक्रिया संथ होते. सेंद्रिय कर्ब कमी होते. 
  • अशा समस्यायुक्त जमिनीमध्ये पिकाच्या मुळांचा विकास योग्य पद्धतीने होत नाही. पिकासाठी कितीही महागडी खते वापरली तरी ती घेता येत नाहीत. खतांद्वारे पिकाला दिलेली नत्र, स्फुरद, पालाश अशी अन्नद्रव्ये पुढे दिलेल्या पाण्यासोबत निचरा होऊन खोल जमिनीत झिरपतात. पुढे ती नदी-नाल्यांना जाऊन मिळाल्याने जलस्रोतांच्या प्रदूषणात भर पडते.
  • मातीचे परिक्षण अत्यंत महत्त्वाचे... मातीच्या आरोग्य व्यवस्थापनेमध्ये मातीची आरोग्यपत्रिका काढून घेणे महत्त्वाचे आहे. मातीची तपासणी करून त्यातील सामू, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण जाणून घ्यावे. त्यानुसार पीक लागवड व शिफारशीप्रमाणे खतांचा वापर करावा. माती आणि पाणी परीक्षण हा पिकाच्या अन्नघटक व्यवस्थापनेचा पाया आहे. माती तपासणीमध्ये गुणधर्मामध्ये काही समस्या आढळल्यास उपाययोजना व त्यानुसार सहनशील पिकांची लागवड करता येते. आम्लयुक्त जमिनीचे गणधर्म :

  • ज्या जमिनीचा सामू ६.५ पेक्षा कमी असतो, त्यांना आम्लधर्मीय म्हणतात.
  • जमिनीचा सामू ५.५ पेक्षा कमी असल्यास जमिनीत जास्त आम्ल असते.
  • या जमिनीत हायड्रोजनयुक्त आयनचे प्रमाण अधिक असल्याने तो पिकास अपायकारक ठरतो. अति आम्ल जमिनीत सूक्ष्मजीवाणूंची वाढ होत नाही.
  • अशा जमिनीमधून पिकांना कॅल्शिअम, मॉलिब्डेनम, स्फुरद, गंधक व नत्राची उपलब्धता कमी राहते.
  • तर लोह, ॲल्युमिनियम, मॅग्नीज, तांबे व जस्त यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते.
  • लोह, मॅग्नेशिअम, ॲल्युमिनिअमचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो.
  • स्फुरद मात्रा स्थिर रूपात जाऊन त्यांची उपलब्धता कमी होते.
  • अन्नद्रव्यांचा लोह व ॲल्युमिनिअमशी संयोग होतो. त्याचे स्थिरीकरण होऊन पिकाला ते अन्नद्रव्य मिळू शकत नाहीत.
  • या सर्व परिस्थितीमुळे पिकांच्या मुळावर अनिष्ट परिणाम होऊन, त्यांची कार्यक्षमता खूप कमी होते.
  • उपाययोजना 

  • ज्या जमिनीचा सामू आम्लता दर्शवितो, अशा जमिनीस चुनखडी देऊन आम्लता कमी करता येते.
  • माती परीक्षणाच्या अहवालामध्ये केलेल्या शिफारशीनुसार चुनखडीचा वापर करावा.
  • सामूत होणारा बदल लवकर होण्यासाठी चुनखडीची बारीक पूड करून ती जमिनीत चांगली खोलवर विखरून टाकावी लागते.
  • आम्ल युक्त खतांचा वापर शिफारशीनुसार करावा.
  • विम्लयुक्त खताचा वापर करावा. उदा. सोडियम नायट्रेट, कॅल्शिअम नायट्रेट, पोटॅशिअम नायट्रेट इ.
  • आम्लयुक्त जमिनीमध्ये भात, नाचणी, बटाटा, मका इ. सहनशील पिकांची निवड करावी.
  • जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात नत्रयुक्त खते जमिनीमध्ये ६ ते ८ सें. मी. खोल द्यावीत.
  • क्षारयुक्त - चोपण जमिनींचे गुणधर्म :-

  • जमिनीचा सामू ८.५ पेक्षा कमी किंवा जास्त असतो.
  • जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) १.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.
  • विनिमय सोडिअमचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त असते.
  • कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्लोराईड/ सल्फेट + सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.
  • जमिनीची जडणघडण बिघडते, पिके पिवळी पडून वाढ खुंटते.
  • पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात.
  • पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो.
  • जमिनीला उतार द्यावा.
  • शेताभोवती खोल चर काढावेत.
  • सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करावा.
  • सिंचनास चांगले पाणी वापरावे.
  • सेंद्रिय खतांचा व जोर खतांचा (निंबोळी पेंड, करंज पेंड इत्यादी) वापर जास्त करावा.
  • तीन वर्षांतून किमान एकदा तरी हिरवळीची पिके उदा. धैंचा, ताग यांची लागवड करून ती ४५ ते ५० व्या दिवशी जमिनीत गाडावीत.
  • माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा आवश्यकतेच्या ५० टक्के पहिल्या वर्षी आणि उरलेली मात्रा दोन वर्षांनी सेंद्रिय खतात मिसळून जमिनीच्या वरच्या २० सें.मी. थरात मिसळावी.
  • सेंद्रिय भूसुधारके मळी, कंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये.
  • ऊस, कापूस, पालक, शुगरबीट, नारळ, विलायची इ. जास्त क्षार सहनशील पिकांची लागवड करावी.
  • चोपणयुक्त जमिनींचे गुणधर्म :

  • सोडिअमयुक्त जमिनीत आयनचे प्रमाण वाढले की, त्या चोपण बनतात. त्यामुळे जमिनीची संरचना व पोत बदलतो. त्यातून निचरा नीट होत नाही.
  • सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता कमी होते. पिकास हवा, पाणी व पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी कमी होत जातो.
  • पिकाची निगा नीट होत नाही.
  • जमिनीचा सामू ८.५ पेक्षा जास्त असतो.
  • जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) १.५ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.
  • जमिनीत सोडिअमचे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटबरोबरचे प्रमाण वाढते.
  • जमिनी पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात अतिशय कडक होतात.
  • जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर व घट्टपणामुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.
  • जमिनीचा वरचा वरचा थर भुरकट म्हणजेच राख रंगाचा दिसतो.
  • जमिनीचा पृष्ठभाग अतिशय टणक व भेगाळलेला बनतो.
  • भूमिगत चरांची व्यवस्था करावी.
  • रासायनिक भूसुधारकांचा वापर करताना मातीपरीक्षण करून जिप्समचा आवश्यकतेनुसार वापर करावा.
  • जमिनीत मुक्त चुना १० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास (जिप्सम) व जास्त असल्यास (गंधक) यांचा शेणखतातून आवश्यकतेनुसार वापर करावा.
  • सेंद्रिय खतांचा उदा. शेणखत, कंपोस्ट व गांडूळ खतांचा वापर नियमित करावा.
  • हिरवळीची पिके धैंचा/ ताग याची लागवड करून, ती ४५ ते ५० व्या दिवशी या प्रमाणे किमान दोन वर्षांतून एकदा तरी गाडावे.
  • आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. उदा. अमोनिअम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी.
  • पिकांना शिफारशीतील नत्राची मात्रा २५ टक्के वाढवून द्यावी.
  • माती परिक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह (फेरस सल्फेट), जस्त (झिंक सल्फेट) ही जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत.
  • सबसॉईलरने खोल नांगरट करावी, परंतु रोटाव्हेरटचा वापर करू नये. जमिनीत नेहमी वाफसा असावी.
  • पाणी व्यवस्थापन ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीने करावे.
  • संपर्क : विलास सातपुते, ९९२३५७५६८५ (सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान आणि रसायन शास्त्र विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, जि. बुलडाणा.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com