राष्ट्रीय पातळीवर झाली ‘कोकण कपिला’ची नोंदणी

कोकण कपिला
कोकण कपिला

पुणे ः कोकणातील उष्ण, दमट हवामान आणि अति पावसात तग धरणारी आणि डोंगराळ भागात चराईवर पोषण आणि दूध उत्पादन देणाऱ्या काटक अशा ‘कोकण कपिला’ या गोवंशाची नोंदणी राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू अानुवंशिक संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली काही वर्षे कोकणातील स्थानिक गाईंचे सर्वेक्षण करून संशोधन करण्यात आले. या संशोधनातून स्थानिक गाईंमध्ये भारतातील इतर गोवंशापेक्षा वेगळपण दिसून आले. या गाईमधील जनुके राज्यातील इतर गाईंपेक्षा वेगळी आहे. अधिक संशोधानंतर राष्ट्रीय पशू अानुवंशिक संशोधन संस्थेने कोकणातील या वैशिष्ट्यपूर्ण गोवंशाची ‘कोकण कपिला’ या नावाने नुकतीच नोंदणी केली. 

पशुपालकांच्या बरोबरीने गोवंश संशोधन आणि संवर्धन  पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख  डॉ. बी. जी. देसाई म्हणाले, की कोकण कपिला हा गोवंश ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये दिसून आला आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही जातिवंत गाय, बैल संशोधनासाठी निवडलेले आहेत. निळेली (जि. सिंधुदुर्ग) आणि वाकवली (जि. रत्नागिरी) येथील प्रक्षेत्रावर विशेष संशोधन प्रकल्प सुरू झाला आहे. सध्या आमच्याकडे ३५ जातिवंत जनावरे आहेत. ज्या पशुपालकांकडे हा जातिवंत गोवंश आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या गोठ्यामध्येही गोवंश संवर्धनास मदत करण्यात येत आहे. आम्ही कोकण कपिला गोवंश सांभाळणाऱ्या पशुपालकांचा गोपालन संघ स्थापन करीत आहोत.  ‘‘या माध्यमाधून एकाच वेळी विद्यापीठातील पशू संशोधन प्रक्षेत्र आणि पशुपालकांच्या गोठ्यातही समांतरपणे संशोधनाच्या नोंदी ठेवण्यात येतील. विद्यापीठातील तज्ज्ञ या पशुपालकांना जातिवंत गोवंश संगोपन आणि संवर्धनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. येत्या काळात पशुपालकांच्या माध्यमातून जातिवंत दुधाळ गोवंश कोकणातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविणार आहेत. विद्यापीठ प्रक्षेत्रावरील कोकण कपिला गाय सध्या प्रति दिन सात लिटर दूध देत आहे. साधारणपणे अडीच वर्षांत पहिले वेत दिल्याचीही नोंद आहे. कोकणातील भातशेतीतील नांगरट, चिखलणी, ओढकाम त्याचबरोबरीने दुधासाठीही हा गोवंश चांगला आहे,’’ असेही ते म्हणाले. असा आहे कोकण कपिला गोवंश

  • कोकणातील उष्ण, दमट आणि अति पावसाच्या प्रदेशात, डोंगराळ भागात चरून पोषण आणि दूध उत्पादनाची क्षमता.
  • तपकिरी काळा किंवा पांढरा भुरा आणि मिश्र रंगांचा गोवंश.
  • लहान ते मध्यम आकार, घट्ट बांधा, सरासरी २५० ते ३०० किलो वजन.
  • डोके मध्यम. प्रथम लहान आकाराची शिंगे असतात, वाढीच्या टप्प्यात ही शिंगे नंतर मागे वळतात. चेहरा सरळ, कान मध्यम आकाराचे सरळ समांतर रेषेत असतात.
  • डोळा, खूर आणि शेपटीचा गोंडा काळ्या रंगाचा.
  • लहान ते मध्यम आकाराचे वशिंडे, मानेखाली लोंबणारी पोळ.
  • चांगली रोगप्रतिकारक शक्ती, काटक गोवंश. त्यामुळे रोगास बळी पडण्याचे अत्यल्प प्रमाण. जनावरे स्वभावाने शांत.
  • कोकणातील उपलब्ध गवत, भात 
  • पेंढ्यावर गुजराण करण्याची क्षमता. सरासरी प्रति दिन २.२५ लिटर दूध उत्पादन.
  • बैल काटक असल्याने शेती मशागत तसेच ओढकामास उपयुक्त.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com