कोल्हापूरसाठी ११,२८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा

कोल्हापूरसाठी ११,२८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा
कोल्हापूरसाठी ११,२८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा

कोल्हापूर : जिल्ह्यात पुढील वर्षासाठी ११ हजार २८२ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदा बॅंकांना २३१५ कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट बॅंकांनी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. या आराखड्याचे प्रकाशन श्री. सुभेदार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते.  या वेळी बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, बॅंक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा प्रबंधक राहुल माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, नाबार्डचे कोल्हापूरचे सहायक प्रबंधक नंदू नाईक, कोल्हापूर मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे किशोर कुमार उपस्थित होते.  बॅंक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक श्री. माने म्हणाले, जिल्ह्यासाठी या वर्षी करण्यात आलेल्या ११ हजार २८२ कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये त्यापैकी प्राथमिक क्षेत्रासाठी ७६४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा एकूण १२ टक्क्यांनी या पतपुरठा आराखड्यात अग्रणी बॅंकेमार्फत वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी या आराखड्यात वाढ करण्यात येते, मात्र या वर्षी कृषी व बचत गटांची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी १२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. नाबार्डने दिलेल्या विशेष सूचनेनुसार आराखड्यात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  कृषी उत्पादनाला मिळणारे चांगले दर तसेच ८० टक्के शेतकरी बॅंकिंग व्यवस्थेखाली आणणे व त्याला लागणाऱ्या संलग्न सेवासाठी २०१८-१९ या वर्षासाठी तब्बल ३ हजार ९३२ कोटी रुपये तरतूद केली आहे. याच कारणासाठी गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये ३४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंत्र माग तसेच इतर लघू उद्योगांसाठी २४१९ कोटी तरतूद करण्यात आली आहे. इतर प्राथमिक क्षेत्रासाठी वाढ करून तब्बल १२९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार स्वयंसाह्यता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५३० शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, या शेतकऱ्यांना २ हजार ८३ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com