कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान; व्यापाऱ्यांची परराज्यांतील गुळाला पसंती
यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील बाजारपेठ राखण्यासाठी झगडावे लागत आहे. हंगाम केवळ एक महिना राहिलेला असताना उत्तर प्रदेश, कर्नाटकच्या गुळाने या बाजारपेठेवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील बाजारपेठ राखण्यासाठी झगडावे लागत आहे. हंगाम केवळ एक महिना राहिलेला असताना उत्तर प्रदेश, कर्नाटकच्या गुळाने या बाजारपेठेवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे.
यंदा उत्तर प्रदेश, कर्नाटकात गुळाचे उत्पादन वाढले आहे. कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातमधील व्यापाऱ्यांना या राज्यांतील गूळ क्विंटलला ३०० ते ४०० रुपयांनी कमी दरात मिळत असल्याने त्यांनी या गुळाला पसंती दिली. परिणामी, कोल्हापुरी गुळाला यंदा झगडावे लागत आहे. गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत असल्याने गुजरात, राजस्थानामधील व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठी गुळाची मोठ्या प्रमाणात खरेदी गेल्या महिन्यात केली. ही खरेदी करताना त्यांना इतर राज्यांतील गूळ खरेदीला प्राधान्य दिले. सध्या सत्तर टक्क्यांपर्यंत शीतगृहांसाठी गुळाची खरेदी झाली आहे.
इतर गूळ पडतोय स्वस्त
यंदा ऊस उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा होत आहे. साहजिकच गुळाच्या उत्पादनातही वाढ होत आहे. जादा उसामुळे यंदा उत्तर प्रदेश, कर्नाटकातही गूळ तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षीच्य तुलनेत या राज्यात सुमारे वीस टक्यांपर्यंत गूळ उत्पादन वाढले आहे. गुळाची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या गुजरात, राजस्थान आदी राज्यांना कोल्हापूरच्या तुलनेत उत्तर प्रदेश, कर्नाटकचा गूळ स्वस्त पडत आहे. वाहतूक खर्चाबरोबर कमी दरातही गूळ उपलब्ध होत आहे. यामुळे गूळ खरेदी करताना कोल्हापुरी गुळाकडे व्यापाऱ्यांनी काणाडोळा केला
.
दर्जा राखण्याचे आव्हान
कोल्हापूरच्या गुळाचा दर्जा राखण्याचेही आव्हान गूळ उत्पादकांपुढे राहिले. मागणी नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुळाचे दर पुन्हा खाली आल्याने चित्र गेल्या महिन्यात दिसले. अगदी ३००० रुपये क्विंटलपर्यंत दराची घसरण झाली होती. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात येत असल्याने गुळाच्या दरात काहीशी वाढ होत असल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले.
गुजरातमध्येही गूळ उत्पादन
यंदा गुजरातमध्येही तेथील उसाचा वापर करून गूळनिर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऊस उत्पादन करणाऱ्या पहिल्या पाच राज्यांत गुजरातचाही समावेश होतो. पण स्थानिक मनुष्यबळ नसल्याने तिथे गूळनिर्मिती होत नव्हती. यंदा मात्र काही व्यापाऱ्यांनी कोल्हापूर भागातून गुळवे व अन्य कामगार गुजरातला नेले आहेत. तेथील उसापासून गूळनिर्मिती सुरू केली आहे. वाहतुकीचा मोठा खर्च वाचत असल्याचा त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. अशीच गूळनिर्मिती सुरू राहिली, तर याचा विपरीत परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या गुळाच्या मागणीवर होऊ शकतो, अशी शक्यता गूळ उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.
कोल्हापूर बाजारपेठेतील सध्याचे गूळ दर | |
दर्जा | सरासरी दर (रुपये/प्रति क्विंटल) |
स्पेशल | ४३०० |
१ | ४०५० |
२ | ३७२५ |
३ | ३३०० |
४ | २९०० |
प्रतिक्रिया..
गुजरातमधून इतर राज्यांतील गुळाला पसंती मिळते आहे, ही बाब चिंताजनक आहे. वाहतुकीच्या खर्चात बचत होत असल्याने गुजराततेतील व्यापाऱ्यांचा ओढा परराज्यांतील गुळाकडे राहिला आहे. या परिस्थितीत गुळाचा दर्जा उंचावून चांगला दर मिळविण्याचे मोठे आव्हान जिल्ह्यातील गूळ उत्पादकांपुढे यंदापासून नव्याने उभे ठाकले आहे.
- निमेश वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर
- 1 of 696
- ››