कोकण, मध्य महाराष्ट्रात नद्या खळाळल्या

 कोकण, मध्य महाराष्ट्रात नद्या खळाळल्या
कोकण, मध्य महाराष्ट्रात नद्या खळाळल्या

पुणे: कोकणासह घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकणासह, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने नद्या खळाळल्या आहेत. यामुळे विविध भागांतील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून, गावांचा संपर्क तुटला आहे. पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. 

रत्नागिरी : जिल्ह्यात समाधानकारक पडणाऱ्या पावसामुळे मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ६५ लघू पाटबंधारे प्रकल्प असून, त्यातील ३१ प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरांतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  सांगली : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण ६८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वारणा, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणा पुरामुळे कोकरुड-वारणा रेठरे बंधारा पूल पाण्याखाली गेला असून, चार गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सोमवारी (ता. ८) दुपारपर्यंत पश्‍चिमेकडे पावसाची रिमझिम सुरूच होती. जिल्ह्यातील राधानगरी धरणात सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.७६ टीएमसी पाणीसाठा आहे.  पुणे : जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाने चांगलाचा जोर धरला आहे. धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या या भागातून नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर, पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यांत हलक्या सरी पडल्या.  सातारा : तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. दिवसभर सरींवर सरी बरसत आहेत. पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील बहुतांश नद्यांची पाणीपातळी वाढत असून, त्या पात्र भरून वाहू लागल्या आहेत. कोयना धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे २७.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.  नगर : नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यातील मुळा व भंडारदरा धरण पोणलोटात पावसाचा जोर कायम आहे. चार दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा झाला. धरण पंचवीस टक्के भरले आहे. मुळा धरणातही नव्या पाण्याची आवक होत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी संततधार कायम असून, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्यांना अक्षरश: झोडपून काढले. जोरदार पावसामुळे पाणीपातळीत वाढ होऊन गोदावरीला पहिला पूर आला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले होते.  त्र्यंबकेश्‍वरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस झाल्याने धरणसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड व सोयगाव तालुक्‍यांत पावसाचा जोर वगळता पावसाची हजेरी तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचीच राहिली. 

परभणी : पूर्णा नदीवरील येलदरी धरणाच्या जलाशयामध्ये यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून सोमवार (ता. ८) पर्यंत एकूण ११.२५० दलमघी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जलाशयातील एकूण पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी, अद्याप या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये २.४० दलघमीची आवक झाली आहे.

जळगाव : जिल्ह्यात रावेर, यावल भागांत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने सुकी व तापी नद्या खळाळून वाहत आहेत. वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तापी नदीला पूर आला आहे. हतनूर पाणलोट क्षेत्र असेलेल्या मध्य प्रदेशमधील बैतुल व सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये मागील तीन दिवस जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे हतनूरचे १२ दरवाजे उघडले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com