कृष्णा नदीचे दीडशे किलोमीटर पात्र कोरडेठाक

कृष्णा नदीचे दीडशे किलोमीटर पात्र कोरडेठाक
कृष्णा नदीचे दीडशे किलोमीटर पात्र कोरडेठाक

कोल्हापूर : नदीकाठावरील गावांची वरदायिनी ठरलेल्या कृष्णा नदीचे महाराष्ट्र राज्यातील राजापूर बंधारा (ता. शिरोळ) पासून ते कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील हिप्परगी धरणापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक किलोमीटरपर्यंत पाण्याअभावी कोरडे पडले आहे. नदीतील उपसापंप उघडे पडल्याने नदीतून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, उसासह अन्य पिकांची होरपळ होत आहे. या भागातील पाणी योजनांही बंद पडल्याने अनेक गावांवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. नदीकाठ बेहाल झाला आहे. कर्नाटक हद्दीतील कृष्णा काठास भेट दिली असता दिसणारे चित्र उद्विग्न करणारे आहे. 

बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, रायबाग, अथणी, मुडलगी कागवाड; विजापूर जिल्ह्यातील तिकोटा, बबलेश्वर, बागलकोट जिल्ह्यातील रबकवी बनहत्ती जमखंडी, तेरदाळसह परिसरात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नदी कोरडी पडली आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा परिसरात पाणीटंचाईचा तीव्र अनुभव घेत आहे. 

सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याने सरकारने कसे तरी पिण्याचे पाणी टँकरने दिले. मात्र जतन केलेली पिके मात्र होरपळून जात असल्याचे चित्र आहे. अजिबातच पाणी नसल्याने पिके सोडून दिल्याशिवाय पर्याय नसल्याची खंत येडूर (ता. चिककोडी) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

जुगुळमध्ये तर अनेकांनी नदीपात्रातच खड्डे काढून साठलेले पाणी शेतीला देण्याचा प्रयत्न चालवला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नदीतील शेती उपसा पंपाची जागा बदलून थोडे फार पाणी असलेल्या ठिकाणी हे पंप लावून जेवढा होईल तितके पाणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण तो प्रयत्न ही अपुरा पडत आहे. पाणी मिळवण्यासाठी सुरू असलेले हे चित्र कृष्णा काठी वेदनादायी आहे. असे जगणे अजून किती दिवस असा सवाल या शेतकऱ्यांनी  केला.

शेतकामे ठप्प  नदी पात्र कोरडे पडल्याने शेतीच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. कृष्णा काठचा हा भाग बागायती असला तरी सध्या मात्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याचे येदूर येथील नितीन देसाई यांनी सांगितले. हरितगृहातील पाण्याचे व्यवस्थापन करणे अशक्य बनल्याने आता आम्हाला या हंगामात लाखोंचा तोटा सहन करावा लागत असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. 

पक्षीय राजकारणात जनतेची होरपळ  कर्नाटकात काँग्रेसचे तर महाराष्ट्रत भाजपाचे सरकार आहे. पण कर्नाटकला पाणी द्या, अशी विनंती करूनही महाराष्ट्र पाणी सोडत नसल्याचा आरोप येथील लोकप्रतिनिधींचा आहे. पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने कृष्णा काठ हादरला आहे. दोन्ही राज्यांनी तातडीने यातून मार्ग काढून पाणी द्यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली. 

समन्वयाची गरज   दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाने उन्हाळ्यापूर्वी नियोजन करणे गरजेचे होते. कोयनेचे पाणी कर्नाटकला आणि आलमट्टीचे पाणी जत भागाला उपलब्ध झाले असते. मात्र दोन्ही सरकारच्या समन्वयाअभावी इतक्या प्रमाणात पात्र कोरडे पडले आहे. याची दखल तातडीने घेणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com