रेंगे, तिडकेंना कृषी कर्मण पुरस्कार प्रदान; 'महाराष्ट्र कृषी'ही सन्मानित

रेंगे, तिडकेंना कृषी कर्मण पुरस्कार प्रदान; 'महाराष्ट्र कृषी'ही सन्मानित
रेंगे, तिडकेंना कृषी कर्मण पुरस्कार प्रदान; 'महाराष्ट्र कृषी'ही सन्मानित

पुणे : तूर, सोयाबीन उत्पादनात लक्षवेधी काम केल्याबद्दल जांब (जि. परभणी) येथील शेतकरी सुमनताई रेंगे यांना; तर भात पिकात उत्कृष्ट उत्पादकता गाठलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील रूळे येथील चिंतामण तिडके यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कृषी कर्मण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अन्नधान्य उत्पादनात सर्वोत्कृष्ट ठरल्याबद्दल महाराष्ट्राच्या कृषी विभागालादेखील पाच कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमध्ये नुकत्याच (ता.२) आयोजित खास सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. बी. येडीयुरप्पा उपस्थित होते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्र्यांचा कृषी कर्मण पुरस्काराचे दोन लाख रुपये आणि प्रशस्तिपत्रक असे स्वरूप आहे. राज्यांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कार गटात कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘पंतप्रधानांचा कृषी कर्मण पुरस्कार’ स्वीकारला.  देशात २०१६-१७ मधील हंगामात सर्वोत्तम काम गेल्याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले आहेत. परभणीच्या जांब भागात आदर्श सोयाबीन व तूर शेती करणाऱ्या सुमनताईंनी या हंगामात एक हेक्टरमध्ये २२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले होते. याच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेत २१ क्विंटल उत्पादन घेतले. त्यांच्या या कामगिरीने कृषी विभागाचे लक्ष वेधून घेतले.  “२०१६ च्या हंगामात राज्याची सोयाबीन उत्पादकता हेक्टरी सरासरी १४ क्विंटल तर तूर उत्पादकता फक्त ९ क्विंटल इतकी होती. त्यामुळे सुमनताईंनी केलेला आंतरपिकाचा प्रयोग चकीत करणारा ठरला. राज्याची सरासरी भात उत्पादकता अवघी ३३ क्विंटल आहे. मात्र, पुण्याच्या वेल्हे तालुक्यातील शेतकरी चिंतामण तिडके यांनी हेक्टरी १२८ क्विंटल भात उत्पादन घेतले. त्यामुळे सुमनताई रेंगे व चिंतामण तिडके हे या पुरस्काराचे मानकरी ठरले,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com