गिरणारे मजूर बाजारामुळे मिळाला रोजगाराचा आधार 

पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह नाशिकच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील पाच तालुक्यांतील मजुरांना गिरणारे येथील मजूर बाजाराने तब्बल सहा महिने अखंड रोजगार पुरवला आहे.
labor market
labor market

गिरणारे, जि. नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह नाशिकच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील पाच तालुक्यांतील मजुरांना गिरणारे येथील मजूर बाजाराने तब्बल सहा महिने अखंड रोजगार पुरवला आहे. दहा हजारांहून अधिक शेतमजुरांना येथे वर्षातील सहा महिने रोजगार मिळाल्याने अडचणीच्या काळात हा बाजार आधार ठरला आहे. 

गिरणारेत हरसूल रस्त्यावरील ईश्‍वर मंदिराजवळ दोन दशकांपासून भरणाऱ्या बाजारात शेतकरी स्वतः मजुरांना रोजंदारीने घेऊन जातात. सकाळी सहापासूनच गिरणारे बाजारात मजूर जमतात. प्रत्येकाला हमखास रोजगार मिळत असल्याने आदिवासी भागातील नागरिकांची रोजगाराची गरज भागते. महिलांना २०० ते ३०० रुपये, तर पुरुषांना २५० ते ४०० रुपये रोजंदारी मिळते. रोजंदारी किंवा एकत्रित मजुरी ठरवून नाशिक, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील शेतकरी स्वतःच्या वाहनातून शेतकरी घेऊन जातात. सालकरी व कामापर्यंत राहण्यासाठी मजुरांची शेतातच सोय केली जाते. टोमॅटो लागवडीपासून तर द्राक्ष काढणीपर्यंत सहा महिने मजुरांना खात्रीने रोजगार मिळतो. 

नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील मुख्य नगदी पीक असलेल्या टोमॅटोच्या लागवडीपासून द्राक्ष काढणीपर्यंत सहा महिन्यांच्या काळात गिरणारेतील मजूर बाजारातील हजारो मजुरांना हमखास रोजगार मिळतो.  ना नोंदणी, ना रोजगार कार्ड  फेब्रुवारीपासून कोरोना लॉकडाउनमध्ये शेतीला मजूर मिळणे दुरापास्त झाले होते. अनलॉक सुरू होताच सप्टेंबरपासून पुन्हा मजूर बाजार गजबजू लागला आहे. स्थलांतरित व रोजंदारी मजुरांची संख्या वाढली आहे. पण येथे कामगार कल्याण विभागाने साधी नोंदणी किंवा रोजगार कार्ड देण्याची सोयही केलेली नाही.  प्रतिक्रिया  रोज दहा हजारांहून अधिक मजुरांमुळे शेतीची सोय होते. मात्र मजुरांच्या आरोग्य, निवारा, पिण्याच्या पाण्यापासून, तर मजूर नोंदणीचीही साधी सोय नाही. राजकीय-प्रशासकीय यंत्रणा आदिवासी भागात रोजगार देण्यात अपयशी ठरत असताना, जिथे रोजगार मिळतो तेथे किमान सुविधा पुरवत नाही. ही मोठी अनास्था आहे.  - विष्णू माळेकर, कृषी मित्र, वाघेरा, ता. त्र्यंबकेश्‍वर  पावसाळ्यात शेती, तर इतर वेळी मजुरी करतो. आदिवासी गावांत रोजगाराची सुविधा नाही. गावात रोजगारसेवक कोण माहिती नाही. मनरेगा कागदावर आहे. त्यामुळे मजूर बाजारात रोजंदारी मिळते. शेतीत रोजगार आहे, हे सरकार समजून कधी सुविधा देईल?  - दत्तू कडाळी, शेतमजूर, मुंगसरे, ता. जि. नाशिक.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com