शेतमजुरीचा दर आणि वेळ निश्‍चित

शेतमजुरीचा दर आणि वेळ निश्‍चित
शेतमजुरीचा दर आणि वेळ निश्‍चित

मलकापूर, जि. सातारा ः शेतमजुरांची मक्‍तेदारी मोडीत काढण्यासाठी चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमजुरीचा ‘एकपारकी’ मजुरीचा प्रकार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या बैठकीत शेतीतील वेगवेगळ्या कामांच्या मजुरीची वेळ व दर निश्‍चित करण्यात आले. 

सध्या शेतमजूर व त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी मजुरांच्या मनाप्रमाणेच कामाच्या वेळा ठरवाव्या लागतात. वेळप्रसंगी मागेल तेवढा मजुरीचा मोबदला व प्रवासासाठी वाहनही द्यावे लागते. त्यावर उपाय म्हणून चचेगावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र बैठक घेतली. त्यात कमी वेळ काम करून जास्त मोबदला घेऊन केला जाणारा ‘एकपारकी’ हा मजुरीचा प्रकारच बंद करण्याचा ठराव केला. कोणीही कोणत्याही मजुराला एकपारकीने कामावर न घेण्याचा निर्णय झाला. 

या निर्णयाबरोबरच भांगलणीसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंतची वेळ ठरवण्यात आली. दुपारी दीड ते दोन ही जेवणाच्या सुटीची वेळ ठरवली आहे. भांगलणीच्या कामासाठी स्त्री व पुरुष मजुरांसाठी २०० रुपये मजुरीचा दर ठरवण्यात आला. शेतातील उसाचा पाला काढणीसाठी एकरी साडेतीन हजार रुपये दर देण्याचे ठरले. उसाचा पाला व तण काढण्यासाठी एकरी एकत्रित चार हजार रुपये दर ठरला. उसाची लागण करण्यासाठी एकरी चार हजार रुपये दर ठरला. ऊसतोड करताना निम्मे वाढे शेतकऱ्यांना व निम्मे मजुरांना देण्यात येईल. शेतातील इतर कामांसाठी मजुरासाठी ३०० रुपये देण्यात येतील. शेतातील पिकांवर औषध फवारणीसाठी प्रती पंप २५ रुपये, मात्र फवारणीसाठी लागणारे पाणी शेतमालकाने आणून देण्याचा ठराव झाला.

शेतातील कोणत्याही पिकाला लागवड टाकण्यासाठी प्रति पोते २० रुपये व वाहतूक असेल तर संगनमताने ठरवण्याचे ठरले. ऊसतोडणीत वाढे बांधणीसाठी ४० रुपये, तर ऊस जाळून नेला तर वाढे बांधणीची मजुरी दिली जाणार नाही. ऊसतोडणीसाठी आलेल्या वाहनाच्या चालकाला जेवण किंवा १०० रुपये देणे, खत भरणी व विस्कटणीसाठी ४०० रुपये मजुरी ठरवण्यात आली. या बैठकीत घेतलेले निर्णय गावातील सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन करण्याचे एकमताने ठरले. 

अशी असेल मजुरी (प्रतिदिवस)  भांगलणी- २०० रुपये, पाला काढणी- ३५०० रुपये एकर, पाला व तन काढणी- ४००० रुपये एकर, ऊस लागण- ४००० रुपये एकर, मजूर- ३०० रुपये (हजरीने), औषध फवारणी- २५ रुपये (प्रतिपंप), ऊसतोड, वाढे बांधणी- ४० रुपये, खत भरणी व विस्कटणे- ४०० रुपये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com