agriculture news in marathi, lack of fodder in Kolhapur, Sangli district, Needs Fodder camps | Agrowon

‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण महाराष्ट्रात प्रचंड चाराटंचाई
राजकुमार चौगुले/ अभिजित डाके
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या नद्या, मुबलक जलस्राेत यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी तालुक्‍यात वर्षभर हिरवाई. यामुळे हिरव्या चाऱ्याची ददात नाही. कितीही दुष्काळ पडू दे, या भागात शेतकऱ्यांकडे मुबलक चाऱ्याचे नियोजन असते. पण पूर आला अन्‌ सगळे नियोजन कोलमडले. शेतातील हिरवा चारा बुडालाच. पण गोठ्यात, शेतात सुरक्षित ठेवलेल्या कडब्याच्या गंज्याही पाण्याखाली गेल्या. मात्र, चाऱ्याअभावी ‘दावणीची दौलत’च खचल्याने कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांतील पशुपालक हडबडून गेला आहे.  

कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या नद्या, मुबलक जलस्राेत यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी तालुक्‍यात वर्षभर हिरवाई. यामुळे हिरव्या चाऱ्याची ददात नाही. कितीही दुष्काळ पडू दे, या भागात शेतकऱ्यांकडे मुबलक चाऱ्याचे नियोजन असते. पण पूर आला अन्‌ सगळे नियोजन कोलमडले. शेतातील हिरवा चारा बुडालाच. पण गोठ्यात, शेतात सुरक्षित ठेवलेल्या कडब्याच्या गंज्याही पाण्याखाली गेल्या. मात्र, चाऱ्याअभावी ‘दावणीची दौलत’च खचल्याने कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांतील पशुपालक हडबडून गेला आहे.  

जिवावर उदार होऊन बहाद्दर अनेक शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित नेवून ठेवली, पाण्यातच दिवस काढले, आता पूर ओसरतोय. पाण्याखाली गेलेले गोठे रिकामे होताहेत. पण चाऱ्याचे काय हा भला मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला. स्वत:च्या शेतात चाऱ्याचे बारा वाजलेत. तातडीने हिरव्या चाऱ्याची मुबलकता होणे कठीण आहे. केवळ जगण्यापुरताच चारा मिळत असल्याने दुधाळ जनावरांची मोठी केविलवाणी अवस्था झाली आहे. 

नियोजनावरच पाणी
दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळी तीन-चार तालुके वगळता इतर सर्व ठिकाणी चाऱ्यासाठी ऊस हे मुख्य पीक आहे. मका, गवतासह हत्तीघास, बाजरी चाऱ्यासाठी होत आहे. पावसाळ्यासाठी उन्हाळ्यातच कोरडे गवत व कडब्याच्या गंज्यांचे नियोजन असते. मात्र, महापुराने ऊस शेतीत आठवड्यापेक्षा अधिक काळ वस्ती केल्याने ऊसासह सर्व चारापिके खराब झाली आहेत. सध्यस्थितीत जनावरांना द्यायचे काय हा प्रश्‍न दोन्ही जिल्ह्यांत गंभीर झाला आहे. 

कारखाने, दूध संघांवरही मर्यादा
दोन्ही जिल्ह्यांत अनेक मातब्बर दूध संघ कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना पुरेसा चारा मिळवून देण्याची जबाबदारी आता दूध संघांवरही आली आहे. आतासे कुठे-कुठे रस्ते खुले झाले आहेत. शिवारात पाणी असल्याने शेतात जाणे शक्‍य नाही. यामुळे चारा कूठून उभा करायचा हा प्रश्‍न आहे. ज्या प्रमाणे पशुखाद्य संघांकडून दिले जाते, त्या प्रमाणे चाऱ्याचीही उपलब्धता करून देणे संघांना क्रमप्राप्त आहे. काही संघांनी परिस्थिती पाहून बाहेरील जिल्हे, तसेच कर्नाटकातून कडबा कुट्टी मागविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु या भागातही पुरेसा चारा उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. महापुराची व्यापकता आणि नुकसान पाहता दूध संघांच्या प्रयत्नालाही मर्यादा पडत आहे. 

साखर कारखान्यांपुढे दुहेरी अडचण
पूर ओसरू लागताच साखर कारखान्यांनी स्वत:कडे नोंद असलेले पाणी न आलेल्या भागातील उसाचे प्लॉट शेतकऱ्यांना खुले करून दिले. पण चाऱ्यासाठी उभा ऊस देणे साखर कारखान्यांसाठी चिंतेचा आणि परवडणारे नसल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. 

चारा छावण्या उभाराव्या लागणार
दुष्काळामध्ये अनेक ठिकाणी चारा नसल्याने जनावरांना चारा छावण्या उभ्या करण्यात आल्या होत्या. अशाच प्रकारच्या चारा छावण्या आता बागायती क्षेत्रातही काही काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून होत आहे. जनावरांची उपासमार टाळण्यासाठी काही दिवस तरी दुसराच कोणताच उपाय नसल्याने आता पूरग्रस्तांसाठी चारा छावण्या उभ्या कराव्यात, अशी मागणी काही गावांतून होत आहे.

चारा पिकाची नोंद नाही
चारा पिकाच्या नुकसानीची कोणतीच नोंद कृषी अथवा पशुसंवर्धन विभागाकडे नाही. यामुळे या पिकांचे किती नुकसान झाले याचा अंदाज व्यक्त करणे अशक्‍य बनले आहे. मका, ज्वारी ही पिके अनेकजण उत्पन्नाबरोबरच चाऱ्यासाठीही घेतात. या पिकांचे मात्र पन्नास टक्क्‍याहून अधिक नुकसान झाल्याने याचा फटका चाऱ्यालाही बसला आहे.

बाहेरील मदत ठरतेय आधार
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बाहेरून येणाऱ्या चाऱ्याचे वाटप करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्‍याला बसला आहे. यामुळे या भागात जास्तीत जास्त चारा जावा याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली. टोलनाक्‍यावर विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेत. तिथे चाऱ्याचे ट्रक दिसल्यास या ट्रकना शिरोळकडे जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निम्म्याहून अधिक गावे ऐंशी टक्के पाण्यात असल्याने या तालुक्‍यात जनावरांची उपासमार अधिक तीव्र प्रमाणात होत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
 

चारा, पशुखाद्य वाटप स्थिती (मेट्रिक टन)
जिल्हा चारा पशुखाद्य
सांगली १७९० २००
कोल्हापूर १९० ५१०

प्रतिक्रिया...
आम्हाला चाऱ्याची कधीच ददात पडत नाही. पण पुरामुळे आम्ही हतबल झालो आहोत. आमची पाच एकर शेती असून सुद्धा ती सर्व पाण्यात गेली आहे. यामुळे जनावराला घालायचे काय, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावात कुठेच चारा मिळत नसल्याने आता उपाशी जनावरे पहाणे असह्य होत आहे.
- सुरेश पाटील, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर

माझी दावणीला १६ जनावरे आहेत. महापुरामुळे चाऱ्याची भीषण टंचाई जाणवून लागली आहे. चारा विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. विकत चारा किती दिवस घ्यायचा असा प्रश्‍न आहे. जवळपास चाराच नाही. त्यामुळे शासनाने जनावरांसाठी दर्जेदार चारा कमी दरात उपलब्ध करून दिला पाहिजे.
- प्रितम पाटील, दुधगाव, ता. मिरज, जि. सांगली 
 

इतर बातम्या
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः...आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...