नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा उत्पादकांची होरपळ
राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या विदर्भात मात्र प्रक्रिया उद्योगाचा अभाव आहे. परिणामी दरवर्षी हंगामात शेतकऱ्यांना दरातील अस्थिरतेचा सामना करावा लागतो आहे.
नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या विदर्भात मात्र प्रक्रिया उद्योगाचा अभाव आहे. परिणामी दरवर्षी हंगामात शेतकऱ्यांना दरातील अस्थिरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळेच गेल्यावर्षी २५ ते ३० हजार रुपये टन असलेला संत्रा यावर्षी मात्र अवघ्या दहा ते बारा हजार रुपये टनाने विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.
राज्यात सरासरी १ लाख ७५ हजार हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील सर्वाधिक १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र विदर्भातील अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात आहे. उर्वरित २५ हजार हेक्टर क्षेत्र राज्यात इतरत्र विखुरलेले आहे. आंबिया आणि मृग बहाराचे मिळून सरासरी वार्षिक सात लाख टन उत्पादन होते. यातील तीस टक्के म्हणजे दोन लाख ८० हजार टन संत्रा फळे ही लहान आकाराची असतात. त्यांना मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी फेकून द्यावी लागतात.
नागपुरी संत्र्याची उत्पादकता सर्वात कमी असल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान होते. परिणामी ५० एमएम पेक्षा कमी आकाराच्या फळांवर प्रक्रिया झाल्यास उत्पादकांना पैसा मिळू शकतो. ही बाब लक्षात घेता नागपूरच्या मिहान येथे रामदेव बाबांच्या पतंजली प्रकल्पाकरिता २३० एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली. ऑरेंज ज्यूस प्रकल्पाची उभारणी येथे होणार होती. २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याचे भूमिपूजन केले.
त्याचवेळी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुका अंतर्गत ठाणाठूणी येथे जैन व कोकाकोला यांचा भागीदारी असलेला जैन फार्म फ्रेश या शंभर एकरावरील प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित होते. पतंजली प्रकल्पात शेड उभारणे यंत्रसामग्री बसविणे अशी कामे झाली. मात्र ठाणाठूणी येथील प्रकल्प २०१६ पासून तसूभरही पुढे सरकला नाही. माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या विषयावर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बैठक झाली. त्यावेळी दोन्ही प्रकल्प सहा महिन्यात कार्यान्वित होतील, असे आश्वासन देण्यात आले होते. पण आजवर परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यास विदर्भातील लहान आकाराच्या सुमारे पंधराशे टन संत्र्यावर प्रक्रिया शक्य होणार आहे. त्यामुळे संत्र्याचे मूल्यवर्धन होण्यास मदत होईल. दरातील पडझड देखील या माध्यमातून थांबविता येईल, असा विश्वास संत्रा उत्पादकांना आहे. त्यामुळे हे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी शासनाने पाठपुरावा करण्याची मागणी या भागातील संत्रा उत्पादकांमधून होत आहे.
दरम्यान, जैन फार्म फ्रेश, कोकाकोला या संयुक्त भागीदारीतील प्रकल्पाचे व्यवस्थापक विजय धाडिवाल यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
अमरावतीचा प्रकल्प पळविला नांदेडला
विदर्भात सर्वाधिक संत्रा लागवड असल्याने अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक परिक्षेत्रात पाल ॲन्ड पार्नटर कंपनीचा ऑरेंज कॉन्सन्ट्रेट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करुन हा प्रकल्प नांदेडला पळविला. त्यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून याला तीव्र विरोध झाला होता. मात्र त्याला जुमानण्यात आले नाही. पेप्सिको कारगिल सीड, एचडीएफसी बँक, पाल ॲन्ड पार्टनर या चौघांच्या भागीदारीतील या प्रकल्पाची क्षमता दोनशे टन प्रति दिवस असून दोनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. ऑरेंज कॉन्सन्ट्रेट, अॅरोमा ऑइल, संत्रा वेस्ट पासून बायोकोल इथे तयार होतात.
प्रतिक्रिया...
संत्रा प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. एखाद्या वर्षी उत्पादन खर्चाची भरपाई देखील होत नाही. त्यामुळे शासनाने पुढाकार घेत पतंजली आणि जैन फार्मफ्रेश या दोन्ही प्रकल्पांना बुस्ट देण्याची गरज आहे. त्याकरिता गरज भासल्यास केंद्र सरकार स्तरावर देखील पाठपुरावा केला पाहिजे.
- मनोज जवंजाळ, शेतकरी, काटोल, जि. नागपूर
विदर्भातील दोन्ही प्रकल्प आर्थिक कारणांमुळे अडचणीत असल्याची चर्चा होती. परंतु त्याविषयी सत्यता माहीत नसल्याने बोलणे सयुक्तिक ठरणार नाही. परंतु हे प्रकल्प सुरू झाल्यास या भागातील संत्रा उत्पादकांचे नशीब पालटणार आहे. लहान आकाराच्या संत्रा फळांवर प्रक्रिया झाल्याने मूल्यवर्धन होत सर्व प्रकारच्या संत्रा दरात तेजी येईल. त्यामुळे या भागात समृद्धी येणार आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.
- 1 of 657
- ››