नगरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४० टक्के कमी पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः आता पावसाळ्याचे तीन महिने संपले असले तरी अजूनही जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. केवळ अकोले तालुक्‍यात झालेल्या पावसावरच धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत तब्बल ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये पाऊस नसला तरी अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू होता. आता तेथेही जवळपास पाऊस थांबला आहे.  

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत अजून पाऊस नाही. नगर जिल्ह्यामध्ये तर ऐन पावसाळ्यात पाऊस नसल्याने पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ३० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस नसल्याने नदी, नाले, गावतलाव, पाझर तलाव व अन्य स्रोतांना पाणीच आले नाही. त्यामुळे आता टॅंकरने पाणीपुरवठा करावा यासाठी प्रस्ताव दिले जात आहेत. विशेषतः शेवगाव, पाथर्डी, जामखेड, पारनेर, संगमनेर, नगर तालुक्‍यांत पाणीटंचाई गंभीर होत आहे.

नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार लाख १७ हजार ४७२ हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून थेंबभरही पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी याचे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. यंदा दोन वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील पावसामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणात पाणीसाठा झाला आहे. त्याचा फायदा राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, नेवासा, श्रीरामपूरला मिळेल. पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे श्रीगोंदा तालुक्‍याच्या काही भागाला आधार मिळाला आहे. मात्र जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र परिस्थिती गंभीर होत असून, अकोल्यातही पाऊस थांबल्याने धरणात येणारी पाण्याची आवकही थांबली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गेल्या वर्षी सरासरी १०० टक्के पाऊस झाला होता, यंदा ६० टक्के पाऊस झाला आहे.   आता परतीच्या पावसाकडे डोळे यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने उलटले आहेत तरीही जिल्ह्यात अजूनही पाऊस नाही. जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीचा पाऊस चांगला पडत असतो. रब्बीचा हंगामही परतीच्या पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आहे. मात्र सध्याचे वातावरण पाहता पाऊस येईल याची कोणालाही शाश्‍वती वाटत नाही. असे असले तरी शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे डोळे लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com