दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

वाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत सुविधा गेल्या १५ वर्षांपासून मिळत नसल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालेगाव तालुक्‍यातील दुबळवेल येथील नागरिकांनी ग्रामसभा घेत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागालाही निवेदन दिले. सोबतच गावाच्या सीमेवर बहिष्काराचे फलक झळकविले.

याबाबत अधिक माहिती अशी, मालेगाव तालुक्‍यातील दुबळवेल या गावातील मूलभूत समस्या सोडविल्या जाव्यात यासाठी नागरिक अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत अाहेत. याबाबत अधिकारी व पदाधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही समस्या निकाली काढण्यात अाल्या नाहीत. या गावाला दोन्ही जिल्ह्याचे अंतर कमी करणारा तोरणाळा, दुबळवेल, हनवतखेडा हा रस्ता शासनाने पंधरा वर्षांत पूर्ण केला नाही. तसेच तालुक्‍याच्या ठिकाणी जोडणारा गुंज- दुबळवेल ते आमखेडा रस्ता पूर्ण केला नाही. नळयोजना शासनाने पूर्ण केली नाही. गावात सरकारी दवाखाना आहे; परंतु त्या ठिकाणी परिचारिका राहत नाही. 

शेजारच्या आमखेडा हनवतखेडा या गावाला दुष्काळग्रस्त गाव जाहीर केले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या दुबळवेल गावाला दुष्काळाच्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. पंधरा वर्षात खासदार संजय धोत्रे यांनी गावाच्या विकासासाठी काहीच निधी दिला नाही. गावाला भेट सुद्धा दिली नाही. काटेपूर्णा नदीपात्रात बंधारे मंजूर झाले, परंतु काम सुरू झाले नाही. धडक सिंचन विहिरीचे कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत.  दोन वर्षांत विकासाचे एकही काम सुरू झाले नाही. त्यामुळे गावात असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या निकाली निघत नसल्याच्या कारणाने आम्ही गावकरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे जनेतचा पैसा खर्च करू नये, गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने अधिकारी व निवडणुकीतील उमदेवार व त्यांचे प्रचारक यांना गावबंदी केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर सरपंच कोमल महादेव वाघमारे, पंचायत समिती सदस्य कुसूम लबडे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष देवढे, उपसरपंच शंकर नानोटे, ग्रामपंचायत सदस्य कैलास तारक, ताईबाई केळकर, वच्छलाबाई लबडे, शारदाबाई देवढे, आशाबाई कालापाड, छायाताई राऊत, मोतीराम नानोटे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com