सिरपूरची भेंडी पोचली सातासमुद्रापार

सिरपूर ः निर्यातक्षम भेंडी उत्पादन घेणारे संतकृपा शेतकरी गटाचे शेतकरी. (छायाचित्र ः माणिक रासवे)
सिरपूर ः निर्यातक्षम भेंडी उत्पादन घेणारे संतकृपा शेतकरी गटाचे शेतकरी. (छायाचित्र ः माणिक रासवे)

नववर्ष २०१८ विशेष...   ------------------------------------------------------ परभणी जिल्ह्यातील सिरपूर (ता. पालम) येथील संतकृपा शेतकरी गटाने पिकवलेली भेंडी सातासमुद्रपार जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली आदी देशांत पोचली. तरुणांनी समूह शक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वेगळ्या वाटेवर टाकलेले पाऊल शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. यामुळे जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. यावर्षी या गटातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठीचे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे विदेशात सिरपूरच्या भेंडीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील पालम हा मागास आणि दुष्काळी तालुका आहे. दरवर्षी अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असते, त्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळणे दूरच. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वदारोमदार खरीप हंगामातील पिकांवर. खरिपाची सुगी संपली की कामाच्या शोधात अनेक गावातील ग्रामस्थांचा शहराकडे लोंढा वाढतो.

गंगाखेड-लोहा-नांदेड राज्य रस्त्यावरील केरवाडीपासून दक्षिणेकडे सिरपूर हे दीड हजार लोकसंख्येच गाव आहे. गावात ३५० खातेदार शेतकरी असून शिवारात हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे. खरिपात सोयाबीन, तूर, कापूस, मूग आदी प्रमुख पिकांवर शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण बेतलेले. फेब्रुवारीपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध असते. हंगामी बागायती क्षेत्रात काही शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. गावाजवळ मोठी बाजारपेठ नाही. परभणी, नांदेड येथील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली की दर कोसळतात. यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे जोखीमेचे ठरते.

या सर्व स्थितीतदेखील गावातील नागनाथ शेवटे हे सेवानिवृत्त शिक्षक शेतीमध्ये विविध प्रयोग करत असत. त्यांनी एका वर्षी नागपूर येथील बाजारपेठेत वांगी नेऊन विकली आहेत. त्यांचा मुलगा पशुपतीनाथ शेवटे हा देखील शेती करत आहे. पशुपतीनाथ शेवटे आणि सुभाष आवरगंड यांच्यासह गावातील तरुण शेतकऱ्यांनी एका निर्यातदार कंपनीच्या प्रतिनिधीची भेट घेऊन निर्यातक्षम

भेंडी उत्पादनाच्या निकषाबाबत माहिती घेतली. त्यानंतर २०१३ मध्ये १९ शेतकऱ्यांनी २२ एकरवर भेंडी लागवड केली. त्यावेळी एकरी ४ ते ५ टन उत्पादन मिळाले. पहिल्या वर्षी निर्यातदार कंपनीच्या माध्यमातून ४० टन भेंडीची दुबई, ब्रिटन आदी देशात निर्यात करण्यात आली. त्यावेळी प्रतिकिलो २० रुपये दर मिळाला. त्याचवेळी स्थानिक मार्केटमध्ये प्रतिकिलो १० ते १२ रुपये दर मिळाले. एकरी २० हजार रुपये खर्च जाता ८० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. निर्यातक्षम भेंडीचे दर निश्चित असल्यामुळे दरातील घसरणीची जोखीम कमी झाली होती.

२०१४ मध्ये या तरुण शेतकऱ्यांनी आत्माअंतर्गत संतकृपा शेतकरी बचत गटाची स्थापना केली. सुभाष आवरगंड अध्यक्ष आणि पशुपतीनाथ शेवटे हे सचिव असलेल्या या गटांमध्ये सुरेश लांडे, शंकर लांडे, मोहन शेवटे, तुकाराम डुकरे, दिपक आवरगंड, बालाजी दुधाटे, नारायण बचाटे, गंगाधर हनवते, धनंजय कदम, त्र्यंबक शेवटे, राम बचाटे, विजय कदम, सुभाष शेवटे, बापुराव कदम, माणिक कदम, भागवत लांडे, पांडुरंग कदम, संभाजी कदम, वैजनाथ लांडे, ज्ञानोबा डोणे या शेतकऱ्यांचा समावेश आहे. गटातील सर्व शेतकरी २५ ते ४० वयोगटातील आहेत.

२०१६ मध्ये २० शेतकऱ्यांनी २० एकरांवर भेंडी लागवड केली. २० टन भेंडीची जर्मनी, इटली देशांना निर्यात केली. २० रुपये किलो दर मिळाले. एकरी ३ ते ४ टन उत्पादन मिळाले. यंदा २४ शेतकऱ्यांनी १९ एकरवर भेंडी लागवड केली आहे.

सामूहिक व्यवस्थापन... गटातील सर्व शेतकरी भेंडीच्या एकाच वाणाच्या बियाण्याची खरेदी करून लागवड करतात. एकरी २८ हजारांपर्यंत झाडांची संख्या राखली जाते. जमिनीच्या पोतानुसार आठवड्यातून १ ते २ वेळा पाणी दिले जाते. २५ दिवसांनी खताची मुख्य अन्नद्रव्ये घटक असलेल्या खतांची मात्रा दिली जाते. आठवड्यातील विषम तारखेला गटातील सर्व शेतकऱ्यांच्या भेंडीचा एकाच दिवशी तो़डा केला जातो. तोडणीनंतर शेतामध्ये प्रतवारी केली जाते. कागदी बाॅक्समध्ये पाच किलो वजनाची पॅकिंग करून निर्यातदाराच्या वाहनामध्ये मुंबईकडे रवाना केले जातात. यंदा ४० टन भेंडीची निर्यात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांमध्ये करण्यात आली असून प्रतिकिलो २२ रुपये दर मिळत आहेत.

फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रामुळे ओळख कृषी मालाच्या निर्यातीसाठी फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. संतकृपा गटातील शेतकऱ्यांना यंदा हे प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मिळालेला जिल्ह्यातील पहिलाच शेतकरी गट आहे. फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रामुळे विदेशात सिरपूरच्या भेंडीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

एकमेकांवरील विश्वासामुळे गटातील सदस्य शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. भेंडी निर्यातीमुळे तरुण शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. यापुढे आता निर्यातक्षम काकडीचे उत्पादन घेणार आहोत. - सुभाष आवरगंड, ९७६३५७०२४० अध्यक्ष, संतकृपा शेतकरी गट, सिरपूर.

अॅग्रोवनचे सुरवातीपासून वाचक आहोत. यशकथा प्रेरणादायी असतात. प्रयोगशील शेतकऱ्यांशी संपर्क करून माहिती घेत असतो. गटशेतीच्या माध्यमातून गावातील शेतकरी विविध प्रयोग करू लागले आहेत. आमच्या अनुभवातून अन्य गावातील शेतकरी निर्यातक्षम शेतीमालाच्या उत्पादनासाठी पुढे येत आहेत. - पशुपतीनाथ शेवटे, ९९२१०४६६८० सचिव, संतकृपा शेतकरी गट, सिरपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com