राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान शहीद अस्थी कलश यात्रा 

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे नेते, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले.
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान शहीद अस्थी कलश यात्रा  Lakhimpur Kheri to be launched across the state Kisan Shaheed Asthi Kalash Yatra
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान शहीद अस्थी कलश यात्रा  Lakhimpur Kheri to be launched across the state Kisan Shaheed Asthi Kalash Yatra

  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे नेते, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले. या घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात आजवर शहीद झालेल्या ६३१ शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी विविध संघटनांकडून राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किसान शहीद अस्थी कलश यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.  देशभर यात्रा काढून शेतकरी आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विविध संघटनांच्या वतीने ही यात्रा राज्यात काढण्यात येत आहे. लखीमपूर खेरी येथील शहिदांच्या अस्थी असलेले कलश महाराष्ट्रात आणण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या चळवळीचे ऊर्जास्थान असलेल्या पुण्यातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यातून या अस्थी कलशांची यात्रा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून विविध मार्गांवरून राज्यभर मिरवणुका व सभा आयोजित करत, राज्यातील जनचळवळींच्या विविध शक्तिस्थानांना भेटी देत यात्रा १८ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या हुतात्मा चौकात पोहोचतील. मुंबईत भव्य सभा घेऊन अस्थी महाराष्ट्राच्या मातीत विलीन करत समारोप करण्यात येणार आहे. राज्यातील संयुक्त किसान मोर्चा, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती यात्रेचे संयोजन करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन कृषी कायदे रद्द करा, किफायतशीर आधारभावाची हमी देणारा केंद्रीय कायदा करा आणि शेतकरी व सामान्य ग्राहकांना उद्ध्वस्त करणारे वीज विधेयक मागे घ्या, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत गेल्या ११ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. मात्र कृषी कायदे अंमलात आणण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने उघडपणे हिंसेचा मार्ग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही या घटनेचा साधा निषेधही केलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी केलेली नाही. त्यांना ३०२च्या गुन्ह्याखाली अटकही करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा मतदारसंघ असलेल्या कर्नालमध्ये उपविभागीय अधिकारी आयुष सिन्हा यांनी शेतकऱ्यांची सरळ डोकी फोडा, असे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे अस्थी कलश यात्रेच्या माध्यमातून भाजप अवलंबत असलेल्या या हिंसेचा तीव्र धिक्कार करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com