‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा विमा

दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने मृत्यू झाल्यास दूध संघातर्फे एक लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी (ता. २४) ही घोषणा केली.
Lakhs of insurance for dairy animals by Gokul
Lakhs of insurance for dairy animals by Gokul

कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने मृत्यू झाल्यास दूध संघातर्फे एक लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी (ता. २४) ही घोषणा केली. 

गोकुळच्या भविष्यातील विस्ताराच्या अनुषंगाने मुंबई व रायगड येथे दूध प्रकल्पासाठी जागा खरेदी व प्रकल्पाच्या अन्य कामांसाठी ३२४ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाला वार्षिक सभेने मान्यता दिली. ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. 

कोरोना स्थितीमुळे यंदाची सभा ऑनलाइन घेण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेवरील ११ विषयांना मंजुरी दिली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा झाली. दरम्यान ‘सभा ऑफलाइन पद्धतीने घेऊन सभासदांच्या प्रश्नाला उत्तर देणे, त्यांच्या शंकेचे निरसन करणे आवडले असते. मात्र, कोरोनामुळे सभेचे ऑनलाइन नियोजन करावे लागले. पुढील वर्षी नक्कीच सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये वार्षिक सभा घेऊ’ अशी ग्वाही अध्यक्ष पाटील यांनी सभेच्या प्रारंभीच दिली. दरम्यान भोकरपाडा येथील सोळा एकर जागा गोकुळ दूध संघाला मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांचा ‘गोकुळ’तर्फे सत्कार करण्यात आला. चेअरमन पाटील यांनी गोकुळच्या वाटचालीचा आढावा घेतला. गोकुळचा विस्तार करण्यासाठी रायगड व मुंबईतील जागा खरेदीचा निर्णय हा योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. 

अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गोकुळ व दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विमा योजना लागू करण्यात येणार आहे. दूध उत्पादकाने कोणत्याही बँकेकडून कर्ज घेऊन दुभती जनावरे खरेदी केली असतील व त्या जनावराचे दूध गोकुळ दूध संघास येत असेल त्यांच्यासाठी विमा योजना असणार आहे. दुभते जनावर कोणत्याही आजाराने मृत्यूमुखी पडल्यास एक लाख इतकी विम्याची रक्कम मिळेल. विमा चालू झाल्यापासून दुभते जनावर पहिले पंधरा दिवस आजारी असू नये. सोळाव्या दिवसापासून पुढे एका वर्षाच्या कालावधीत कोणत्याही आजाराने जनावर मृत झाल्यास विमा दिला जाईल. दोन जनावरांची विमा रक्कम प्रत्येकी एक लाख रुपये इतकी राहील. दोन लाख रुपयांचा वार्षिक विमा हप्ता ४५०० रुपये इतका आहे. 

कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी आभार मानले. या प्रसंगी संचालक शशिकांत पाटील चुयेकर, सुजित मिणचेकर, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, विरोधी गटाचे संचालक शौमिका महाडिक,बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, चेतन नरके आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com