जनावरांमध्ये दिसतोय ‘लंपी स्कीन डिसीज'

राज्याच्या काही भागात लंपी स्कीन डिसीज हा गो व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
lampi skin disease in animals
lampi skin disease in animals

राज्याच्या काही भागात लंपी स्कीन डिसीज हा गो व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावराच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. ही लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाय करावेत. गाई व म्हशी मधील सर्व वयाच्या जनावरांना लंपी स्कीन डिसीज हा त्वचारोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण साधारणतः १० ते २० टक्के असून मृत्युदर १ ते ५ टक्के इतका असतो. या विषाणूचे शेळ्या-मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले, तरी हा आजार शेळ्या-मेंढ्यांना होत नाही. देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मानवास जनावरांपासून हा आजार होत नाही. आजाराची कारणे

  • लंपी स्कीन डिसीज हा आजार देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स या विषाणू मुळे होतो.
  • चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, इ. द्वारे हा आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होतो.
  • कीटकांमार्फत प्रसार होत असल्याने हा आजार उष्ण व दमट वातावरणात जास्त होतो.
  • आजाराचा प्रसार

  • बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा आजार निरोगी जनावरात पसरतो.
  • संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.
  • साधारणतः ४ ते १४ दिवस हा कालावधी या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होते. त्यामुळे जनावराचे विविध स्राव, जसे डोळ्यातील पाणी, नाकातील स्राव, लाळ, इत्यादींमधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होते.
  • त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतो. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगाद्वारेही याचा संसर्ग होऊ शकते.
  • आजाराची लक्षणे

  • हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
  • सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इ. भागात येतात.
  • बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात.
  • निमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.
  • अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.
  • निदान

  • त्वचेवरील व्रणाच्या खपल्या, रक्त, रक्तजल नमुने गोळा करून त्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून निदान केले जाते.
  • भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत याचे पक्के निदान पिसीआर या चाचणीद्वारे केले जाते.
  • उपचार

  • हा आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने जिवाणू प्रतिबंधक औषधी म्हणजे प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत ताप कमी करणारी औषधे, प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्त्व अ व ई तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करणे गरजेचे आहे.
  • वेदनाशामक व अँटि हिस्टॅमिनिक औषधांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.
  • जनावरास मऊ व हिरवा चारा व तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरोग्लीसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते.
  • प्रतिबंध

  • निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.
  • प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांवर तसेच गोठ्यात डास, माश्या, गोचीड इ.चे प्रमाण कमी करण्यासाठी यासाठीच्या आवश्यक औषधांची फवारणी करावी.
  • गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
  • जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी.
  • बाधित क्षेत्रात गाई म्हशींची विक्री, पशू बाजार इ. बंद करावे.
  • बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करत असताना किंवा रोग नमुने गोळा करत असताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुऊन घ्यावेत. तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतुक करावे.
  • बाधित परिसरात स्वच्छता करावी. निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा. याकरिता १ टक्का फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराइट याचा वापर करावा.
  • लसीकरण

  • प्रादुर्भावग्रस्त भागापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना पशूतज्ज्ञांच्याकडून गोट फॉक्स लस १ मिली प्रति जनावर याप्रमाणे सब-क्युटॅनियस मार्गाने टोचावी.
  • आधीच रोगग्रस्त असणाऱ्या जनावरांना लस टोचण्यात येऊ नये. 
  • आजाराची लक्षणे जनावरात आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात कळवून तज्ज्ञांच्याकडून योग्य उपचार करून घ्यावेत.
  • संपर्क- (डॉ. परकाळे, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथे कार्यरत आहेत. डॉ. लिमये, सह आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग आणि डॉ. सुनील लहाने, साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे येथे कार्यरत आहेत

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com