उंबरशेत खाडी किनाऱ्यावरील शेतजमीन झाली नापीक

तालुक्यातील उंबरशेत गावाच्या कार्यक्षेत्रात सावित्री खाडी किनाऱ्यावरील खारे पाणी अडविणारा धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी निकामी झाला आहे.
unproductive land
unproductive land

मंडणगड, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील उंबरशेत गावाच्या कार्यक्षेत्रात सावित्री खाडी किनाऱ्यावरील खारे पाणी अडविणारा धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी निकामी झाला आहे. त्यामुळे खलाटी भातशेतीत खाडीच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने शेकडो एकर जमीन नापीक बनली आहे. गावाच्या खलाटीतील २५ हेक्टर भातशेतीला धोका निर्माण झाला असून, शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधनच नष्ट होत चालले आहे. उंबरशेत गावाची लोकसंख्या सुमारे ४२५ इतकी आहे. प्रमुख व्यवसाय शेती असणाऱ्या या गावाचे एकूण क्षेत्रफळ १५३ हेक्टर असून ३२ हेक्टर क्षेत्र भातशेती लागवडीखाली आहे. पाणथळ खलाटी परिसर असल्याने वर्षानुवर्षे येथील शेतकरी दुबार पिके घेत आहेत. मात्र या शेतीला संरक्षण म्हणून खाडीचे पाणी अडविणारे जुने मातीचे बंधारे तीन ते चार ठिकाणी पाण्याच्या पुराने फुटले. परिणामी, सावित्री खाडीचे खारे पाणी खलाटी परिसरात घुसून पसरू लागले. या पाण्यातून वाहून आलेला गाळ, घाण, कचरा शेतात पसरला. बारमाही पाणी साचून राहिल्याने दलदल बनून खाजण क्षेत्र वाढत आहे.  अशा या जमिनीत पीक घेणे मुश्कील झाल्याने शेतकऱ्यांनी जमिनी पडीक ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे खाडीकिनारी व खारभूमीत येणाऱ्या खारफुटींची वाढ होऊ लागली आहे. परिणामी शेतीक्षेत्र घटले आहे. शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून नादुरुस्त बंधारे नव्याने बांधण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. मात्र याकडे शासन, प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने येथील शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे.  प्रतिक्रिया सावित्री खाडी किनाऱ्यावरील लोकरवण, पडवे, पेवेकोंड, पणदेरी, कोंडगाव, गोठे खलाटी, भामघर चौकी, घुमरी, उमरोली, वेसवी, वेळास, साखरी, आंबवली, खारी या गावांची अशीच अवस्था असून, शेतीला फटका बसला आहे. शासनाने विशेष मोहीम राबवून ही समस्या सोडवावी. - नरेश बोर्ले,  उंबरशेत, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com