`पॉलिहाउस, शेडनेटधारकांना कर्जमुक्ती द्या`

शेतकरी परिषद
शेतकरी परिषद

नगर : सरकारची धरसोडीची धोरणे, दुष्काळ, वातावरणातील बदल व नैसर्गिक आपत्तीमुळे शेडनेट, पॉलिहाउसधारक शेतकरी कर्जाच्या संकटात सापडले आहेत. पॉलिहाउस शेडनेटसह संपूर्ण शेती विकली तरी त्यांच्यावर झालेले कर्ज फिटणार नाही, अशी या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. सरकारने या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी करत नगर येथे पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांची राज्यव्यापी परिषद संपन्न झाली.   अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस, डॉ. अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व उदय नारकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील सैनिक कल्याण लॉन्सवर संपन्न झालेल्या कर्जमुक्ती परिषदेसाठी राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उद्योग तोट्यात गेल्यावर अशा उद्योगांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार ज्या आत्मीयतेने सामोरे येते त्याच आत्मीयतेने सरकारने आपल्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा या वेळी राज्यभरातून आलेल्या पॉलिहाउस, शेडनेटधारक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आपल्याला संकटात मदत म्हणून आपल्यावरील कर्ज सरकारने रद्द करावे, पॉलिहाउस, शेडनेटमध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व पिकांना व पॉलिथिन पेपर, पॉलिनेटसह स्ट्रक्चरला संपूर्ण विमा संरक्षण द्यावे, नाशवंत शेतीमालाला भावाच्या चढ-उतरापासून संरक्षणासाठी धोरण घ्यावे, औषधे, कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यासह निविष्ठांच्या दरांवर नियंत्रण करणारे धोरण स्वीकारावे यासारख्या रास्त मागण्या या वेळी करण्यात आल्या.   परिषदेनंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सरकरी धोरणांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण सुपूर्त करत आहोत. निवेदनाची दखल न घेतल्यास अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकाराने दिनांक २० फेब्रुवारी रोजी नाशिक वरून निघत असलेल्या लॉंग मार्चमध्ये राज्यभरातील पॉलिहाउस. शेडनेटधारक शेतकरी हजारोंच्या संख्येने सामील होतील, असा इशारा या वेळी देण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com