राज्यपालांकडून शेतकऱ्यांना लॅपटॉप भेट

राज्यपालांकडून शेतकऱ्यांना लॅपटॉप भेट
राज्यपालांकडून शेतकऱ्यांना लॅपटॉप भेट

मुंबई : जल व्यवस्थापन, फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, पशुसंवर्धन यांसह विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या १२ शेतकऱ्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राजभवन येथे नुकतेच लॅपटॉप भेट दिले. जून महिन्यात दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहोळ्यात सन्मानित केलेल्या या शेतकऱ्यांना आपल्यातर्फे लॅपटॉप देण्याचे राज्यपालांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार लॅपटॉप वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी राज्यपाल म्हणाले, की कृषी ही भारताची संस्कृती असून, शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करीत देशाला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण केले. मात्र आज शेतजमीन अनेक तुकड्यांमध्ये वाटली जाऊन शेतकऱ्यांकडील सरासरी जमीन अतिशय घटली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण गोष्टींचा अंगीकार केल्यास शेतकरी संपन्न होईल. राज्यात पाण्याचे संकट गंभीर रूप धारण करत असून, अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दृष्टीने पाण्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली आहे. आजचा शेतकरी शिक्षित आहे. त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यामुळे कृषी संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास मदत होत आहे. गटशेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे मत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले. राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांच्या वतीने ब्रह्मदेव सरडे (ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी मनोगत व्यक्त केले. संजय ज्ञानोबा शिंदे (नेकनूर, जि. बीड, जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), ब्रह्मदेव नवनाथ सरडे, सोगाव, जि. सोलापूर (कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्य), दत्तात्रेय गणपतराव गुंडावार, भद्रावती, जि. चंद्रपूर (कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य), ईश्वरदास धोंडीबा घनघाव, डोंगरगाव, जि. जालना (ग्रामीण कृषी प्रक्रिया उदयोगातील उल्लेखनीय कार्य), बाळासाहेब गीते, जि. उस्मानाबाद (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), अशोक राजाराम गायकर, जिल्हा रायगड, (मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), शरद संपतराव शिंदे, जि. नाशिक (फळे, फूलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), लक्ष्मण जनार्दन रासकर, जि. नाशिक (फळे, फूलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), सौ. विद्या प्रल्हाद गुंजकर, जि. बुलडाणा (कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), सुधाकर मोतीराम राऊत, जि. बुलडाणा (कृषिपूरक उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), ताराचंद चंद्रभान गागरे (माजी सैनिक) जि. अहमदनगर (कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), श्रीकृष्ण सोनुने जि. अहमदनगर (कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारी संस्था) अशी पुरस्कारार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com