कसमादे पट्ट्यात हिवाळी बहाराच्या शेवगा उत्पादनात मोठी घट

कसमादे पट्ट्यात हिवाळी बहाराच्या शेवगा उत्पादनात मोठी घट
कसमादे पट्ट्यात हिवाळी बहाराच्या शेवगा उत्पादनात मोठी घट

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेवगा उत्पादक पट्ट्यात त्याचा मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात सततच्या बदलत्या हवामानामुळे घेतला जाणारा हिवाळी बहार अडचणीत सापडला आहे. त्यामुळे काढणी हंगाम दोन ते अडीच महिने पुढे ढकलला असून, उत्पादन ६० टक्क्यांवर घटले आहे.  जिल्ह्यात कसमादे परिसरात मालेगाव, सटाणा तालुक्यांत शेवग्याच्या लागवडी अधिक आहेत. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस हिवाळी बहार सुरू होतो. मात्र, अतिवृष्टीमुळे हाच हिवाळी बहार जानेवारीत सुरू झाला. त्यामुळे फळधारणेवर त्याचा मोठा परिणाम झाला असून उत्पादकता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र अतिवृष्टीमुळे जमिनीत पाण्याचा निचरा वेळेवर न झाल्याने झाडाच्या मुळ्यांची कार्यक्षमता मंदावली. त्यामुळे बहार धरण्याच्या प्रक्रियेत मोठ्या अडचणी हंगामात आल्या आहेत. सततच्या पावसामुळे बहार गळून पडल्याने तसेच उरलेला तयार होत असलेल्या मालाची फळधारणा अवस्थेत गळ झाली. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने छाटणीनंतर झाडांची वाढ अधिक झाली तर फुलधारणा झाली नसल्याने उत्पादकता घटली आहे. त्यात भुरी व करप्याचा अधिक प्रादुर्भाव झाल्याने पीक संरक्षण खर्च अतिरिक्त वाढला आहे. त्यामुळे वर्षभर नियोजन करून उत्पादन घेणारा शेतकरी अतिवृष्टीचे परिणाम सहन करत आहे. त्यामुळे हिवाळी बहार हातातून गेल्याने उन्हाळी बहार धरण्यासाठी छाटण्यांचे नियोजन सुरू आहे. मात्र, हाही बहार पुढे जाणार असल्याने शेतकऱ्यांचे पिकातील वार्षिक नियोजनात मोठे बदल झाले आहेत.  या आहेत प्रमुख अडचणी 

  • छाटणीनंतर झाडांची अधिक वाढ
  • फुलधारणा होताना अडचणी व गळ
  • फळधारणा होताना उशीर
  • वातावरणाच्या बदलांमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
  • फुलकुज, शेंगागळ अधिक झाल्याने उत्पादकतेत मोठी घट  

    मालेगाव तालुका शेवगा उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत हिवाळी बहार अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाला. त्यामुळे हंगाम तीन महिने पुढे गेल्याने पिकाचे व्यवस्थापन करण्यात अधिक मेहनत व उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. - महेश पवार,  शेवगा उत्पादक, पवारवाडी, ता. मालेगाव 

    १० एकर क्षेत्रावर लागवड केली आहे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्याने हंगाम पूर्ण अडचणीत सापडला. अवघे २५ टक्के उत्पादन यावर्षी आल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. - मनोहर खैरनार, शेवगा उत्पादक, डोंगराळे, ता. मालेगाव   

  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com