पुणे विभागात गहू काढणी अंतिम टप्प्यात

पुणे विभागात गहू काढणी अंतिम टप्प्यात
पुणे विभागात गहू काढणी अंतिम टप्प्यात

पुणे ः उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने रब्बी हंगामातील गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत पुणे विभागात ही काढणी उरकण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे रब्बी हंगामात काही ठिकाणी उत्पादनात जवळपास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या एक ते दीड महिन्यापासून गव्हाची काढणी सुरू झाली आहे. पाणीटंचाईमुळे उशिराने गव्हाच्या पेरण्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे काढणीही उशिराने सुरू झाली होती. विभागात गव्हाचे सरासरी एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ७५ हजार ६६४ हेक्टर म्हणजेच ४९ टक्के पेरणी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात देशीवाणासह, संकरित वाणाची पेरणी केली होती. 

यंदा या शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीक कर्ज घेऊन रब्बीची तयारी केली होती, परंतु परतीचा पुरेसा पाऊस न झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता आली नाही.परिणामी, विभागात मोठ्या प्रमाणात क्षेत्र पेरणीपासून वंचित राहिल्याचे चित्र आहे. नदीकाठच्या व धरणाच्या परिसरात पाण्याची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली. 

त्यामुळे काही प्रमाणात पेरण्या झाल्याचे दिसून आले. परंतु विहिरीच्या पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्या ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्याने पिकांना पाणी देण्यास अडचणी तयार झाल्या. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 

याशिवाय पाणीटंचाईमुळे कोरडवाहू भागात पुरेशा प्रमाणात गव्हाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणामही उत्पादनावर झाला असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांमधून बोलले जाते. सध्या गव्हाची काढणी अंतिम टप्यात आली असली तरी त्याला मजूर टंचाईचा मोठा फटका बसत आहे. त्यावर पर्याय म्हणून बहुतांशी शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे थेट काढणी करण्यास प्राधान्य दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com