सातारा जिल्ह्यात चारा छावण्यांचे अनुदान अखेर वर्ग

Lastly the subsidy credited for fodder camps in Satara district
Lastly the subsidy credited for fodder camps in Satara district

दहिवडी, जि. सातारा : मागील चार महिन्यांपासून प्रलंबित असलेले चारा छावण्यांचे तब्बल १२३ कोटी रुपयांचे अनुदान पुणे विभागीय आयुक्तांकडे वर्ग झाले. त्यामुळे चारा छावणी चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

जुलै महिन्यापासून चारा छावण्यांचे अनुदान न मिळाल्याने चारा छावणीचालक आर्थिक संकटात सापडले होते. खर्चाचा ताळमेळ बसविताना ते मेटाकुटीला आले होते. ऊस, पेंड आणताना पंधरा दिवसांत अनुदान मिळेल, या आशेवर उधारीवर आणले होते. मात्र अनुदान न मिळाल्याने उधारी भागविताना अगोदर उसनवारी, तर त्यानंतर टक्केवारीवर पैसे उचलून देणी भागवली. मात्र त्यानंतरही अनुदान न मिळाल्याने टक्केवारीने घेतलेल्या पैशांचे व्याज भागविताना चारा छावणीचालकांची दमछाक झाली होती. त्यातच सरकार बनविण्याचा गोंधळ सुरू असल्यामुळे चारा छावणीचालकांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नव्हता.

चालक मामूशेठ वीरकर यांनी माजी पशू संवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन व्यथा त्यांच्यासमोर मांडली. जानकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. राज्यपालांनी मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर निंबाळकर यांना चारा छावणीचालकांचे अनुदान संबंधित विभागांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुणे विभागाकडे १२३ कोटी रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले. 

२६ नोव्हेंबर रोजी या अनुदानातील सातारा जिल्ह्यासाठीचे जुलै महिन्यासाठीचे १५ कोटी ११ लाख व ऑगस्ट महिन्यासाठीचे ११ कोटी ६३ लाख रुपये अनुदान पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात आले, तर २७ नोव्हेंबर रोजी माण प्रांताधिकारी कार्यालयाकडे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे अनुदान वर्ग करण्यात आले. 

तीन दिवसांत खात्यावर जमा होण्याची शक्यता

अजूनही सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्याचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान येणे बाकी आहे. मात्र जुलै व ऑगस्ट महिन्याचे अनुदान आल्याने छावणीचालकांना दिलासा मिळाला. कागदपत्रांची पूर्तता केलेल्या चारा छावणीचालक संस्थांच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत अनुदान जमा केले जाण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com