नाशिकमध्ये लेट खरीप कांद्याची आवक वाढली

जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड अडचणी व मजूर टंचाई अशा कारणांमुळे व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांना कामकाज बंद ठेवण्याबाबत विनंती अर्ज दिले होते. त्यानुसार २७ मार्चपासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद होते.
Late kharif onion arrives in Nashik
Late kharif onion arrives in Nashik

नाशिक : जिल्ह्यात मार्चअखेर, बँक बंदमुळे रोकड अडचणी व मजूर टंचाई अशा कारणांमुळे व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांना कामकाज बंद ठेवण्याबाबत विनंती अर्ज दिले होते. त्यानुसार २७ मार्चपासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद होते. मात्र, सलग दहा दिवसानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू झाले. मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. यात लेट खरिपाची अधिक तर उन्हाळी कांद्याची आवक कमी असल्याचे पाहायला मिळाले.

मार्चच्या मध्यापर्यंत संपणाऱ्या लेट खरीप कांद्याची चालू वर्षी सुरूच आहे. त्यात उन्हाळी कांद्याच्या बियाण्यांत ३० टक्के फसवणूक झाल्याने हे अतिरिक्त उत्पादन यावर्षी आहे. त्यामुळे ही आवक १५ एप्रिलपर्यंत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. लेट खरीप कांद्याला टीकवण क्षमता नसल्याने नुकसान होऊन प्रतवारीच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यात ३० टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान आहे. त्यामुळे बाजार समित्या सुरू होताच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली आहे.

त्यात लेट खरिपाची अधिक तर उन्हाळी कांद्याची आवक कमी राहिली. त्यामुळे लाल कांद्याचे दर घसरल्याचे पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे लिलाव बंद राहतात, अन् अशा परिस्थितीत बाजार समित्यांचे व्यवस्थापन मूग गिळून गप्प राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोलताना संताप व्यक्त केला. जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये आवक अधिक असल्याने सोमवारी (ता. ५) कामकाज उशीरापर्यंत सुरू होते. त्यामुळे आवकेची आकडेवारी स्पष्ट झाली नाही.

शेतकऱ्यांच्या मोहिमेला प्रतिसाद कांदा उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी सोशल मीडियावर ‘रांगडा’ विकणार; उन्हाळी रोखणार’ अशी जनजागृती करण्यात आली.ज्यामध्ये नुकसान टाळण्यासाठी लेट खरीप कांदा प्राधान्याने विकावा तर टिकणारा उन्हाळी कांदा विक्रीविना थांबवावा, या आशयाचे आवाहन होते. ही मोहीम सोशल मीडियावर रविवार (ता. ४) पर्यंत राबवून कांदा उत्पादकांना आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्याचे आवकेवरून स्पष्ट झाले आहे.

विंचूर येथे आवक मोठ्या प्रमाणावर होती. औरंगाबाद मार्गावर निफाड व लासलगावकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूला शेतकरी वाहने घेऊन आले होते. आम्ही स्वतः मराठवाड्यातून विक्रीसाठी आलो होतो. मात्र, आवक वाढल्याचा फायदा घेत लिलाव प्रक्रियेत घाईत करून कमी दराने खरेदी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांची अशी पद्धत शेतकरी विरोधी आहे - अण्णासाहेब बोराडे, कांदा उत्पादक, हिलालपूर, ता. वैजापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आल्याने कामात अडचणी आहेत. त्यात बाजार समित्यांचे जास्त दिवस कामकाज बंदमुळे आवक वाढून दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी व व्यापारी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे पारंपरिक बंद ठेवण्याचे स्वरूप बदलून जास्तीत जास्त दिवस कामकाज होणे अपेक्षित आहे. व्यापारी वर्गाने सकारात्मक दृष्टिकोनातून पावले उचलायला हवी. - जयदत्त होळकर, माजी सभापती व संचालक, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com