हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
बातम्या
लेट खरीप कांद्याची आवक बाजारात टिकून
उष्णता वाढत असल्याने लेट खरीप कांद्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात अजून नुकसान वाढू नये यासाठी शेतकऱ्यांनी हा कांदा विक्रीला आणण्याची मोहीम प्राधान्याने हाती घेतली आहे.
नाशिक : उष्णता वाढत असल्याने लेट खरीप कांद्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात अजून नुकसान वाढू नये यासाठी शेतकऱ्यांनी हा कांदा विक्रीला आणण्याची मोहीम प्राधान्याने हाती घेतली आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या आवकेला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या तुलनेत ६५ टक्के कांदा हा लेट खरीप बाजारात अधिक असल्याचे पणन मंडळाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
बाजार समित्या सलग दहा दिवस बंद झाल्यानंतर शेतकरी एकदाच कांदा विक्रीला येऊन गर्दी करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. आर्थिक अडचण असल्याने विक्रीसाठी गर्दी कायम आहे. मात्र शेतकऱ्यांनी कांद्याच्या विक्रीत सुयोग्य नियोजन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आधी लेट खरीप लाल रांगडा कांदा अन् नंतरच उन्हाळ अशी पद्धत राबविण्यात येत आहे. नाशवंत व टिकवणक्षमता नसलेला लाल कांदा प्राधान्याने आणत असून उन्हाळ कांदा रोखला जात आहे. त्याअनुषंगाने उन्हाळ कांदा चाळी भरण्याच्या कामांना जिल्हाभरात वेग आला आहे.
जिल्ह्यात सोमवार (ता. ५) नंतर बाजार समित्या सुरू झाल्यानंतर लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात तर उन्हाळची तुलनेत कमीच होत असल्याचे चित्र कायम आहे. लासलगाव बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून सोमवार (ता. ५) व मंगळवार (ता. ६) रोजी अनुक्रमे २९४४० व २९१०० क्विंटल, तर विंचूर उपबाजार आवारात २४८९० व २१२७० आवक लेट खरीप कांद्याची आवक झाली. तर बुधवारी (ता. ७) याच क्षमतेने आवक असल्याचे सूत्रांनी सांगितले. तुलनेत मात्र ८ हजार क्विंटलवर उन्हाळ कांद्याची आवक झालेली नाही. पिंपळगाव बसत बाजार समितीतही लेट खरीप कांद्याची आवक २५ हजार क्विंटलवर आहे. तर उन्हाळ कांद्याची आवक सरासरी १२ हजार क्विंटलवर होती. यांसह कमसादे भागात सटाणा, नामपूर, कळवणसह येवला बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक हळूहळू वाढत आहे.
उन्हाळ म्हणून लागवड केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे लेट खरीप निघाल्याने लाल कांद्याची आवक अधिक होत आहे. तर या वर्षी बियाण्यांत दोष असल्याने टप्प्याटप्प्याने उन्हाळ कांदा विक्री करतो आहे. मात्र घरगुती बियाण्यांची लागवड केलेले उन्हाळ कांदे साठवून ठेवणार आहे.
- सचिन कडलग, कांदा उत्पादक, हनुमाननगर, ता. निफाड
कांदा जिल्हाभरात आवक स्थिती (क्विंटलमध्ये) | ||
कांदा प्रकार | ५ एप्रिल | ६ एप्रिल |
लेट खरीप लाल कांदा | १,३२,८५३ | १,१३,२९३ |
उन्हाळ | १,०८,६४६. | ७५,१५० |
एकूण | २,४१,४९९ | १,८८,४४३ |
(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, नाशिक विभागीय कार्यालय) |
- 1 of 1591
- ››