लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सक्तीच्या रजेवर; उपोषण मागे

लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सक्तीच्या रजेवर; उपोषण मागे
लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सक्तीच्या रजेवर; उपोषण मागे

लातूर : येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य हटाव या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले. शनिवारी (ता. १) कृषी विद्यापीठाने प्राचार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यानंतर रात्री विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे सोमवारपासून हे महाविद्यालय आता नियमित सुरू होणार आहे. येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची बदली करावी या प्रमुख मागणीसाठी २७ जानेवारीपासून विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करीत होते. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे, विद्यावेतन दिले जात नाही, वसितगृहात सुविधा नाहीत अशा अनेक मागण्या या विद्यार्थ्यांच्या होत्या.  गेले सहा दिवस हे आंदोलन सुरू होते. सध्या थंडीचे दिवस आहेत. तरी देखील महाविद्यालयातील युवक युवती रात्रीच्या वेळी कुडकुडत प्रवेशद्वारावरच झोपली होती. या सहा दिवसांच्या कालावधीत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे एक पथक पहिल्यांदा येऊन गेले.तरी देखील या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही. त्यानंतर कुलगुरू डॉ. अशोक ढवण येथे आले. त्यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कारवाई करतो पण आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले. पण विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिवांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्याचाही फायदा झाला नाही. या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. पूर्ण आठवडाभर या आंदोलनामुळे महाविद्यालय बंद राहिले. अखेर या आंदोलनाची दखल विद्यापीठाला घ्यावी लागली आहे. यात विद्यापीठाने कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठोंबरे यांना १ फेब्रुवारीपासून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांच्या प्राचार्यपदाचा पदभार चाकूरच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे प्राचार्य हेमंत पाटील यांच्याकडे दिला आहे. विद्यापीठाने हे आदेश काढल्यानंतर या विद्यार्थ्यांनी प्रभारी प्राचार्य पाटील यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या परिसरात सहा दिवस आंदोलन केले म्हणून सहा वृक्ष लावून हे आंदोलन मागे घेतले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com