लातुरात मनसे कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालक कार्यालय फोडले 

बोगस बियाणाप्रकरणात संबंधित बियाणे कंपन्या व शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. १४) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील कृषी सहसंचालक कार्यालय गाठले. तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून हे कार्यालय फोडून टाकले.
लातुरात मनसे कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालक कार्यालय फोडले 
लातुरात मनसे कार्यकर्त्यांनी कृषी सहसंचालक कार्यालय फोडले 

लातूर ः गेल्या काही दिवसांपासून महाबीजसह खासगी कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण झाली नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे अशा बोगस बियाणाप्रकरणात संबंधित बियाणे कंपन्या व शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. १४) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील कृषी सहसंचालक कार्यालय गाठले. तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून हे कार्यालय फोडून टाकले. या घटनेचा शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस तपास करीत आहेत. 

राज्यात ४० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. राज्यात आत्तापर्यंत ५३ हजार ९२९ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. यात शासनाच्या महाबीज कंपनीसह इतर कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार घरगुती बियाणे पेरले पण ते उगवले नाही, अशांच्या तक्रारी घ्याव्यात, त्यांनाही भरपाई द्यावी आदी मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते मंगळवारी (ता. १४) येथील कृषी सहसंचालक कार्यालयात गेले. तेथे निवेदन देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार होती. पण संबंधित अधिकारी कार्यालयात नव्हते. त्यामुळे हे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी कृषी सहसंचालक कार्यालय फोडून टाकले. 

यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, अशा घोषणाही या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर हे कार्यकर्ते तेथून निघून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच कृषी विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com