वेगळ्या विचारांचा सन्मान करणे शिकून घ्या : शरद पवार

वेगळ्या विचारांचा सन्मान करणे शिकून घ्यावे : शरद पवार
वेगळ्या विचारांचा सन्मान करणे शिकून घ्यावे : शरद पवार

नाशिक  : ‘‘धनंजय​ मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार जाहीर केल्यानंतर सार्वजनिक वाचनालयावर दबाव आणणाऱ्या प्रवृत्तींनी वेगळ्या विचारांचा सन्मान करण्याइतपत मनाचा मोठेपणा शिकून घ्यावा. अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्‍तिमत्त्व व उदारपण समजून घ्यावे. सार्वजनिक जीवनात वावरताना किमान दोन चांगले ग्रंथ तरी वाचावेत. बाकी मला या प्रवृत्तींकडून फार अपेक्षा नाहीत,’’ असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंडे यांना हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर काही प्रवृत्तींनी हा पुरस्कार रद्द करावा, असा दबाव सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांवर आणल्याचा दावा या वेळी करण्यात आला. हाच धागा पकडून पवार यांनी ही टीका केली. माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर उपस्थित होते. 

ज्येष्ठ समाजवादी नेते माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे सतरावे वर्ष होते. ५० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

मुंडे म्हणाले, ‘‘पाठीवर थाप देऊन फक्‍त लढ म्हणा’ असे म्हटले जाते. पण आजवर फक्‍त लढणेच नशिबी आले. पवार साहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हा स्वर्णक्षण आहे. तो पाहायला आज वडील असते, तर ते आणखी पंधरा वर्षे जगले असते. घरातून वेगळे काढल्यानंतर कोणाकडे जावे, असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यावेळी पवार यांनी आधार दिला. मोठ्या विश्‍वासाने विरोधी पक्षनेतेपद दिले.’’ 

‘‘आजवर विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळात १६ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. हा पुरस्कार म्हणजे एकही विकेट न काढता केवळ चांगली बॉलिंग करणाऱ्याला ‘मॅन ऑफ मॅच’ने गौरविण्यासारखे आहे. मी १६ विकेट काढल्या होत्या. फक्‍त अंपायर प्रामाणिक नव्हता,’’ असा टोला मुंडे यांनी सरकारला लगावला. 

नानासाहेब बोरस्ते यांनी स्वागत, श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. आमदार हेमंत टकले यांनी पुरस्कार निवड समितीच्या वतीने मनोगत व्यक्‍त केले. प्रा. डॉ. वेदश्री थिगळे यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास शौचे यांनी आभार मानले. 

शहीद जवानाच्या कुटुंबाला मदत पुरस्काराच्या ५० हजार रुपयांच्या रकमेत आणखी स्वतःचे ५१ हजार रुपये घालून एक लाख रुपये शहीद निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबीयांना देत असल्याची घोषणा या वेळी मुंडे यांनी केली. वाचनालयालाही ५० हजार रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com