राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपये

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) लिंबाची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना १२०० ते २००० रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
 Lemons in the state rate 600 to 3000 rupees
Lemons in the state rate 600 to 3000 rupees

औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये 

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) लिंबाची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना १२०० ते २००० रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद येथील बाजार समितीमध्ये २१ मे रोजी १२ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २२ मे रोजी १८ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १७५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. २३ मे रोजी १७ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १६०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. 

२४ मे रोजी २० क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. २५ मे रोजी १५ क्विंटल आवक झालेल्या लिंबाला सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

पुण्यात गोणीला १०० ते २५० रुपये  

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी तीन हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. कोरोना नियमांमुळे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरु आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २७) आवक मंदावली होती. तर गोणीला १०० ते २५० रुपये दर होते, अशी माहिती लिंबाचे प्रमुख आडतदार रोहन जाधव यांनी दिली. 

बाजार समितीमध्ये लिंबाची आवक ही प्रामुख्याने नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांमधून होत आहे. सध्याची कोरोना नियमांमुळे शहरातील हॉटेल, खानावळी, बंद असल्याने लिंबाची मागणी घटली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने दर कमी आहेत. उन्हाळ्यामध्ये मागणी असल्याने सरासरी दर प्रति गोणी ५०० ते ७०० रुपये एवढी असते. एक गोणी साधारण पणे १६ ते २० किलोची असते, तर यामध्ये सरासरी ४०० ते ५०० लिंबे असतात, असे जाधव यांनी सांगितले.

सोलापुरात प्रतिक्विंटलला ९०० ते २००० रुपये दर

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबाची आवक बऱ्यापैकी राहिली. तसेच मागणी टिकून असल्याने दरही स्थिर राहिले. लिंबाला किमान ९०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लिंबाची रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत आवक राहिली. ही आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्याला मागणी आहे. 

या आधीच्या सप्ताहातही आवक रोज ३० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. तर लिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. दरातील किरकोळ चढ-उतार वगळता त्याचे दर स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

नगरमध्ये क्विंटलला २००० ते २५०० रुपये

नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबांची गुरुवारी (ता.२७) तीन क्विंटलची आवक झाली. त्यांना दोन ते अडीच हजार रुपये व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला आहे. लिंबाची आवक आता कमी झाली आहे. 

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साधारण दहा ते पंधरा क्विंटलची आवक होत असते. गेल्या पंधरा दिवसांपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या पातळीवर लिंबाची विक्री केली. कालपासून बाजार समित्या सुरु झाल्या आहेत.

लिंबाला दोन ते अडीच हजार रुपये व सरासरी २२५० रुपयांचा दर मिळाला आहे. लिंबाची आवक आता कमी झाली आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी  लिंबाच्या घाऊक व ग्राहकांना केल्या जाणाऱ्या किरकोळ विक्रीत मोठी तफावत पाहायला मिळत होती. शेतकऱ्यांना प्रतिकिलो २५ ते ४० रुपये दर मिळत होता. तर ग्राहकांना ८० ते १२० रुपये दराने खरेदी करावी लागली.

नांदेडमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये

नांदेड : नांदेड येथील भाजीपाला मार्केटमध्ये कागदी लिंबांना अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सध्या बाजारात ३० ते ४० क्विंटल लिंबं येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

नांदेड येथील तरोडा नाका तसेच इतवारा भागातील ठोक भाजीपाला बाजारात सध्या शेतकऱ्याकडून लिंबू विक्रीसाठी येत आहे. उन्हाळा असल्यामुळे लिंबाच्या भावात तेजी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. स्थानिक लिंबाला सध्या अडीच ते तीन हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात २५ रुपये डझन याप्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. उन्हाळा असल्यामुळे लिंबाला मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

अकोल्यात क्विंटलला १२०० ते १५०० रुपये 

अकोलाः गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कडक लॉकडाऊनमुळे बाजार बंद आहेत. यामुळे शेतमाल विक्रीच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा फटका आता लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.

लिंबाचे दर गडगडले आहेत. सध्या १५ किलो वजनाची लिंबाची गोणी १०० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. गेल्या महिन्यात एवढ्याच वजनाच्या गोणीचा दर ५०० रुपयांवर होता.

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमुळे मध्यंतरी काही दिवस बाजार बंद ठेवण्यात आले. आजही मोठ्या शहरातील बाजारपेठा बंद आहेत. शिवाय हॉटेल्सही सुरु नसल्याची सर्वाधिक झळ लिंबू उत्पादकांना बसली. 

लिंबाची मागणी अत्यंत कमी आहे. उठावही नाही. वास्तविक उन्हाळ्यात लिंबाला सर्वाधिक मागणी राहते. अकोल्यातील लिंबू उत्तरेकडील राज्यात जाते. दिल्ली ही प्रमुख बाजारपेठ आहे. दिल्लीकडून मागणीच नसल्याने लिंबाचे दर कमालीचे घसरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

परभणीत क्विंटलला ६०० ते ९०० रुपये

परभणी ः येथील मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२७) लिंबाची २० क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल किमान ६०० ते कमाल १००० रुपये, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या परभणी, सेलू, पूर्णा, जिंतूर तालुक्यातून लिंबाची आवक होत आहे. संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मागणी कमी आहे. गेल्या आठवड्याभरात दररोज १५ ते २० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२७) लिंबाची २० क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com