जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशत
गेल्या सहा महिन्यांत जनावरांसह माणसांवरही बिबट्याचे हल्ले वाढले आहे. सध्या राज्यातील साधारण नगर, बीड, औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या आठ जिल्ह्यांच्या काही भागात बिबट्याची दहशत आहे.
नगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या शेतीवर आता बिबट्याच्या दहशतीचे परिणाम होताना दिसत आहेत. गेल्या सहा महिन्यांत जनावरांसह माणसांवरही बिबट्याचे हल्ले वाढले आहे. सध्या राज्यातील साधारण नगर, बीड, औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या आठ जिल्ह्यांच्या काही भागात बिबट्याची दहशत आहे.
बिबट्याच्या भीतीने शेतकामांना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. बिबट्याच्या संकटाचा रब्बीच्या पिकांवर याचा परिणाम होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक हजारांपेक्षा अधिक गावांतील नागरिक, शेतकरी भेदरलेले आहेत.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बिबट्याने बळी घेतला, चार लोकांवर हल्ले केले. राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, अकोले, नगर तालुक्यांत सातत्याने बिबटे दिसत आहेत. शेजारच्या सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सातारा, सांगली भागातही बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. बीडमध्येही बिबट्याने तीन दिवसांत दोन बळी घेतले आहेत. पैठण तालुक्यातही बाप-लेकांचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेला आहे.
सध्या सर्वच भागात कापसाची वेचणी सुरू आहे. तुरीचे पीक जोमात असून, सहा फुटांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे तर रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांद्याची पेरणी व त्याला पाणी देण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे रात्रीही शेतकऱ्यांनी शेतात जावे लागत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मात्र बिबट्याच्या हल्ल्याने अनेक भागात शेतकरी शेतात जायला धजावत नाहीत. ज्या भागात माणसांवर व पाळीव जनावरांवर हल्ले केलेत त्या ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावले आहेत. मात्र तरीही हल्याचे प्रकार थांबताना दिसत नसल्याने लोक भेदरलेले आहेत. सायंकाळी सहानंतर गावे सामसूम होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आठ जिल्ह्यांत एक हजारांपेक्षा अधिक गावांत बिबट्याची दहशत पसरली आहे.
रब्बीतील कामांचा खोळंबा
बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीने रात्री बाहेर न पडण्याचा तसेच दिवसाही काळजी घेण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीचा परिणाम रब्बीतील पिकांवर होत आहे. वेळेवर पाण्यासह मशागत झाली नाही तर त्याचा उत्पादन घटण्यावर थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना आणि पावसाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांवर आणि शेतीवर बिबट्याचे नवे संकट उभे राहिले आहे. ज्या भागात बिबट्याची दहशत आहे. त्या भागात उसाचीही तोड सुरू आहे. ऊसतोडीवरही बिबट्याची धास्ती दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वच भागात एकाच वेळी बिबट्याच्या वाढत्या संख्येने वन विभागही हतबल झाला आहे.
कुत्री, डुकरांमुळे अधिवास वाढतोय
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, ‘बिबट्या हा अत्यंत लाजाळू आणि घाबरट प्राणी आहे. जिल्ह्यातील दाट वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच प्रत्येक बिबट्याला त्याचा स्वतंत्र अधिवास आवश्यक असतो. हा अधिवास मिळत नसल्यानेच बिबट्या मानवी वस्तीकडे येतो. त्यातच गाव परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. या अस्वच्छतेवरच कुत्रे, मांजरी, डुकरे हे प्राणी आपली गुजराण करीत असतात. त्यामुळे गावाकडे आलेल्या बिबट्याला कुत्रे आणि रानडुकरांसारखे प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात. त्यामुळे बिबट्यांचे गावाकडे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रतिक्रिया
ग्रामीण भागात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. संख्या वाढत असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे, लोकांना बिबटे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मोठा आवाज होईल असे गाणे लावणे, घुंगराची काठी वापरणे या सारख्या बाबीचा वापर करणे गरजेचे आहे. वाढती संख्या पाहता राज्यात बिबटे निवारण केंद्रे वाढण्याची गरज
आहे.
- मंदार साबळे, राष्ट्रीय वाघ संरक्षण समितीचे सदस्य, नगर
........
बिबट्या पूर्वी ही होता, आताही आहे. मात्र अलीकडे संख्या वाढल्याने अधिवास अधिक प्रमाणात दिसून येत आहे. माणसांच्या रक्ताची चव लागलेला नरभक्षक किंवा वयस्क असल्याने मोठी शिकार करता येत नसलेला बिबट्या माणसांवर हल्ले करू शकतो. अनेक भागात बिबटे असून ही त्यांचा त्रास नाही. मात्र माणसांवर हल्ला करणारा बिबट्या पकडल्याशिवाय पर्याय नाही.
- सिद्धार्थ सोनवणे, वन्यजीव अभ्यासक, बीड
- 1 of 653
- ››