मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना साथीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले असताना, यंदा पुन्हा खरिपासाठी राज्यातील शेतकरी जिद्दीने खरिपाची तयारी करीत आहेत.
crop loan
crop loan

पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना साथीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले असताना, यंदा पुन्हा खरिपासाठी राज्यातील शेतकरी जिद्दीने खरिपाची तयारी करीत आहेत. मात्र बॅंकांचे पीककर्ज वाटप आतापर्यंत केवळ २० टक्क्यांपर्यंत झाले आहे. मॉन्सून आशादायक असूनही बॅंकांच्या सुस्तपणामुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. 

सहकारी बॅंकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासन व बॅंकांनी एकत्रितपणे केलेल्या २०२१ च्या नियोजनानुसार शेतकऱ्यांना खरिपासाठी ४० हजार ५०० कोटी रुपयांचे पीककर्ज द्यायचे होते. जूनच्या आधी पैसा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी मुख्यत्वे जूनमध्ये मशागतीसाठी गुंतवणूक करतो. मात्र १५ मेपर्यंत पीककर्ज वाटप आठ हजार कोटींच्या आसपास झालेले होते. आता हा आकडा वाढलेला असेल. मात्र काही जिल्ह्यांत कर्जवाटप अतिशय निराशाजनक आहे. 

कर्जवाटपात अमरावती आणि पुणे हेच दोन विभाग आघाडीवर होते. त्यांनी मेच्या पंधरवड्यापर्यंत ३० टक्क्यांपर्यंत कर्जवाटप केले होते. मात्र औरंगाबाद विभागात साडेसहा हजार कोटी रुपये वाटप करायचे असताना केवळ सात टक्के म्हणजे ८०० कोटी रुपयांच्या आसपास कर्ज वाटले गेले होते. कोकण आणि नागपूर विभागात देखील कर्जवाटप संथगतीने सुरू आहे. 

‘‘कर्जवाटपात तुलनेने सहकारी बॅंकांचे काम समाधानकारक आहे. कारण मे अखेरीस सहकारी बॅंकांनी शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींच्या आसपास कर्ज वाटलेले आहे. यंदा राज्यातील सहकारी बॅंका खरिपासाठी एकूण साडेतेरा हजार कोटींच्या आसपास कर्ज वाटणार आहेत. मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकांना २० हजार कोटी रुपये वाटायचे आहेत. त्यांनी १५ मेपर्यंत शेतकऱ्यांना अवघे ११०० कोटी रुपये वाटले होते. यातून राष्ट्रीयकृत बॅंकांच्या काही शाखांचा शेतकऱ्यांविषयीचा आकस दिसून येतो,” अशी माहिती सहकारी बॅंकेच्या एका कार्यकारी संचालकाने दिली. 

अॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआयसारख्या बॅंकांना यंदा खरिपासाठी सव्वा चार हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचे नियोजन देण्यात आले आहे. मात्र, या बॅंकांनी देखील मेअखेरपर्यंत ४०० ते ५०० कोटी रुपये वाटलेले होते. राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांना कर्जवाटपाचा वेग वाढविण्यासाठी तंबी दिली पाहिजे, असे मत बॅकिंग क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.  आम्हाला जमते, त्यांना का नाही?  यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम महादेवराव कोंगरे म्हणाले, की कोरोना, लॉकडाउन यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशावेळी बॅंकांनी माणुसकी दाखवली पाहिजे. मी आणि माझा कर्मचारी वर्गाने नियोजन करून आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ते उद्दिष्टाच्या ९० टक्के आहे. इच्छाशक्ती ठेवली तरच ते होते. आम्हाला जमते मग इतर बॅंकांना का नाही? बॅंकांनी वेळेत कर्जवाटप केले नाही तर शेतकऱ्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.  अशी आहे पीककर्जाची स्थिती 

विभाग उद्दिष्ट वाटप टक्के 
कोकण १०७८ ९९ ९ 
नाशिक ९२८० १८६३ २० 
पुणे ९०४३ २५०० २८ 
औरंगाबाद ११०३२ ७९६ ७ 
अमरावती ६६७१ २००२ ३० 
नागपूर ३४३१ ५०३ १५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com