मंचर बाजारात मागणीअभावी बटाटा वाणाची पोती पडून

मंचर बटाटा बाजारपेठेला पूर्वीसारखं वैभव प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न बाजार समितीमार्फत केले जातील. एकरी उत्पादन वाढीसाठी बटाट्याचा सुधारित वाण व उत्पादित बटाट्याला किमान प्रतिकिलो २० रुपये दर मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामध्ये यश आल्यास बटाटा लागवड क्षेत्रात वाढ होईल. - देवदत्त निकम, सभापती, आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर.
मंचर बाजारात बटाटा वाणाला मागणी कमी आहे
मंचर बाजारात बटाटा वाणाला मागणी कमी आहे

मंचर, जि. पुणे  : येथील बटाटा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रती क्विंटलचे बाजारभाव ५०० रुपयांनी कमी होऊनही खरेदीदार शेतकरी नसल्याने बटाटा वाणाची पोती पडून आहेत. रविवारपर्यंत (ता. १३) एक हजार ३४३ टन बटाटा वाणाची आवक झाली. परंतु, अजून २५ टक्केही बटाटा वाणाची विक्री झालेली नाही.

मंचरची बटाटा बाजारपेठ राज्यात सर्वांत मोठी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बटाटा वाण खरेदी विक्रीचे व्यवहार खरीप व रब्बी हंगामात होतात. आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुके बटाटा उत्पादनात अग्रेसर होते. पण, आता एकरी उत्पादनात घट होत आहे. तसेच कीटकनाशके, खते, मजुरी खर्चात वाढ झाली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी उत्पादित बटाट्याला प्रती किलोला १८ ते वीस रुपये बाजारभाव मिळत होता. सध्या प्रती किलोला १४ ते १५ रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. आर्थिक तोटा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरवली आहे, असे व्यापारी  धनेश रामजी थोरात व पंढरीनाथ पोखरकर (माडीवाले) यांनी सांगितले.

मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जालंदर (पंजाब), इंदौर, मध्यप्रदेश भागातून बटाटा वाण विक्रीसाठी आला आहे. तीस अडत्यांमार्फत बटाटा वाणाची विक्री शेतकऱ्यांना केली जाते. गेल्यावर्षी प्रती क्विंटलला १६०० ते २२५० रुपये असा बटाटा वाण विक्रीचा बाजारभाव होता. सध्या प्रती क्विंटल एक हजार ३०० ते एक हजार ८०० रुपये विक्रीचा बाजारभाव आहे. आता बटाटा वाण पाठवू नका, असे जालंदर व इंदौर भागांतील व्यापाऱ्यांना कळविले असल्याची माहिती व्यापारी संजय मोरे यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com