चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस

पाऊस
पाऊस

पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा, मॉन्सूनचे उशिराने झालेले आगमन यामुळे राज्यात यंदा पावसाने सरासरी गाठलेली नाही. पावसाचे वितरण असमान असल्याचेही दिसून आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने ओढ दिली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडलेला नाही. राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये सरासरापेक्षा कमी पाऊस झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन यंदा खूपच लांबले. साधारणत: ७ जून रोजी महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होणारा मॉन्सून यंदा २० जून रोजी पोचला. १९७२ नंतर यंदा प्रथमच मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले. यापूर्वी पूर्वमोसमी पावसानेही राज्यात समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यानंतर मॉन्सून दाखल होत असताना आलेल्या वायू वादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात निम्मा जून महिना कोरडा गेला. जून अखेर आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसाने सरासरी वाढविण्यास मदत झाली. रविवारपर्यंत (ता. १४) राज्यात ३४६.८ (९९ टक्के) पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा ३० टक्क्यांहून कमी पाऊस पडल्याने बहुतांशी भाग अद्यापही तहानलेला आहे.  १ जून ते १४ जुलैपर्यंतच्या जिल्हावार पावसाचा विचार करता पुणे आणि पालघर जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप अधिक तर नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सातारा कोल्हापूर जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, नगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बुलडाणा येथे सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबारसह, विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अपुरा पाऊस पडला आहे. यवतमाळ, सोलापूरसह नांदेड, हिंगोली, वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाने सर्वाधिक ओढ दिली आहे.

टंचाई काही हटेना  निम्मा जुलै महिना उलटूनही पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने औरंगाबाद, अमरावती, पुणे, नाशिक विभागांतील २२ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई कायम आहे. राज्यातील ३ हजार ५७५ गावे, ९ हजार ५६६ वाड्यांना ४ हजार ७९८ टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा  पुरवठा करण्यात येत आहे. कोकणातील पाणीटंचाई दूर झाली असून, कोल्हापूर, नंदूरबार, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सध्या पाणीटंचाई भासत नाही. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, पुणे विभागातील सोलापूर आणि नाशिक विभागांतील नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. नाशिक विभागातील १ हजार ५८ गावे, ३ हजार ८७२ वाड्यांना १ हजार २२५ टॅंकरने, पुणे विभागातील ८८२ गावे, ५ हजार ४२७ वाड्यांना १ हजार ५१ टॅंकरने, औरंगाबाद विभागातील १ हजार २१० गावे, २६७ वाड्यांना तब्बल २ हजार १९१ टॅंकरने, अमरावतील विभागातील ४२२ गावांना ३२४ टॅंकरने, तर नागपूरमधील ३ गावांना ३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. पावसाचे असमान वितरण राज्यातील तालुकानिहाय आकडेवारी विचारात घेता पर्जन्यमानाची स्थिती चिंता वाढविणारी आहे. मात्र, अद्यापही अनेक तालुक्यांमध्ये पावसाचे वितरण असमान असल्याचे चित्र आहे. यात मराठवाडा, विदर्भातील अनेक तालुक्यांना पावसाने ओढ दिली असून, उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यांचा यात समावेश आहे. राज्यातील ५१ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के कमी, तर १४७ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला आहे. ८१ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली असून, ७४ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस पडल्याचे कृषी विभागाकडील नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com