नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमी पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच पाऊस आहे. आतापर्यंत केवळ अकोले तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडलेली असून तेथे सरासरीच्या दुप्पट पाऊस झालेला आहे. कर्जत तालुक्यात मात्र आतापर्यंत केवळ ३४ टक्केच पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. अकोले तालुक्यातील पावसावर अवलंबून असलेली उत्तरेतील धरणे पूर्ण भरलेली असली दक्षिण भागातील काही धरणे मात्र कोरडीठाक आहेत.  

नगर जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस नाही. आतापर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार जिल्ह्यामधील २६ महसूल मंडळांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. साधारण २५ महसूल मंडळांत ७५ टक्के तर ९ महसूल मंडळांत शंभर टक्क्यांच्या जवळपास पाऊस झाला. चार महसूल मंडळांमध्ये तर २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यंदा पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही अजूनही अनेक भागांत जोराचा पाऊस नाही. त्याचा परिणाम खरिपावर झाला असून रब्बीची चिंता लागली आहे.

गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात मोठे नुकसान झाले. चारा आणि पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. यंदा परिस्थिती सुधारण्याची आशा असताना पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना मात्र घोर लागला आहे. अल्प पावसावर पिके तरारलेली दिसत असली तरी उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जोराचा पाऊस नसल्याने पाणीटंचाईशी सामना करावा लागत असून परतीचा पाऊस चांगला झाला नाही तर रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी ४९७.४ मिलिमीटर असून आतापर्यंत ४०५.९४ मिमी पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. फक्त अकोल्यात आतापर्यंत १०६८ मिमी म्हणजे दुपटीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे 

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात मिलिमीटरमध्ये झालेला पाऊस) अकोले ः २१५.३७ (१०६८), संगमनेर ः ९९.८६ (४१६), कोपरगाव ः ९२.४६ (४०७), श्रीरामपूर ः ७५.१२ (३५३), राहुरी ः ७१.६३ (३४३), नेवासा ः ९७.५० (५१८), राहाता ः ७२.६९ (३२०), नगर ः ७४.४७ (३९२), शेवगाव ः ३७.३२ (३७९), पाथर्डी ः ६६.०९ (३६३), पारनेर ः ६४.७८ (३०७), कर्जत ः ३४.४६ (१७४), श्रीगोंदा ः ६९.९५ (३१२), जामखेड ः ५२.६४ (३२९).

चार धरणे कोरडी जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा ही उत्तरेतील मोठी आणि महत्त्वाची धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे केलेला आहे. मात्र, अजूनही चांगला पाऊस नसल्याने दुष्काळग्रस्त तालुक्यातील सीना, खैरी, घाटशीळ, मांडओहळ यांसह गाव पातळीवरील मध्यम व लघु प्रकल्प, गाव तलाव, पाझर तलाव, नद्या, नाले कोरडे आहेत. सध्या सीना धरणात ७, खैरी धरणात २, मांडओहळ धरणात २२ तर घाटशीळ धरणात ० टक्के पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com