हमीभावातील खरेदीला कमी प्रतिसाद

हमीभावातील खरेदीला कमी प्रतिसाद
हमीभावातील खरेदीला कमी प्रतिसाद

अकोला : मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू केलेल्या हमीभावातील खरेदीला जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात सुरू केलेल्या पाच खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, भरडधान्याची खरेदी नाममात्र झाली असल्याची बाब खरेदीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.

मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात तेल्हारा, बार्शिटाकळी, पातूर, वाडेगाव, पारस या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रांवर ६९७५ या दराने मुगाची अवघी ४९७० क्विंटल खरेदी झाली. एक हजार चार शेतकऱ्यांनी मूग विक्री केला. याच केंद्रावर ५६०० रुपये दराने १९०१ शेतकऱ्यांनी ८७६३ क्विंटल उडीद विकला. सोयाबीन विक्रीलाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

१० हजार क्विंटल भरडधान्य खरेदी

बाजारपेठेतील कमी दर लक्षात घेता शासनाने महाराष्ट्र स्टेट को. ऑप मार्केटिंग फेडरेशनमार्फत जिल्ह्यात भरडधान्याचीही खरेदी सुरू केली. यासाठी अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा या सात ठिकाणी केंद्रे उघडण्यात आली. यापैकी मूर्तिजापूर येथे ३१ डिसेंबरअखेर एक किलोही खरेदी झाली नाही. उर्वरित बार्शीटाकळी (६७ क्विंटल), पातूर (११० क्विंटल) या केंद्रांवरसुद्धा अल्प प्रतिसाद मिळाला. अकोला येथे २४४७ क्विंटल, अकोट २५७७ क्विंटल, बाळापूर २४९५ आणि तेल्हारा २९६१ क्विंटल अशी एकूण १० हजार ६५९ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली. आता खरेदी केंद्रावर आवकच नसल्याने बहुतांश ठिकाणी मोजमाप ठप्प आहे.

शेतकरी केंद्रावर विक्रीसाठी उदासीन

मागील दोन, तीन हंगामातील अनुभव पाहता शासकीय केंद्रावर आधारभूर किमतीने शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागणे, गदारोळ झाल्याचे प्रकार घडले. मात्र ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया, विक्रीनंतर चुकारे मिळण्यास होणारा विलंब, काही शेतमालाचे खुल्या बाजारातील दर, आदीमुळे शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवली. अनेकांनी ऑनलाइन नोंदणी करूनसुद्धा शेतमाल विक्रीला आणला नाही. यंदा विक्री झालेल्या शेतमालाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com