निम्म दूधना प्रकल्पात अपुरा साठा ः आवर्तनाची शक्यता मावळली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पात यंदा पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. उपसा तसेच बाष्पीभवनामुळे साठ्यात घट सुरू झाली आहे. वितरण प्रणालीची कामे रखडत असून या प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे यंदा सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता मावळली आहे.

परभणी जिल्ह्यात लाभक्षेत्र असलेल्या जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिध्देश्वर या धरणांमध्ये तसेच करपरा आणि मासोळी या दोन मध्यम प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, निम्न दुधना प्रकल्पात रविवार (ता. २४) सकाळी १३.४० टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. धरणातील पाण्याची आवक बंद झालेली आहे. पाणीपुरवठा योजना तसेच कृषी पंपाव्दारे उपसा सुरू असल्याने या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात घट होत आहे. गतवर्षी २४ नोव्हेंबरला निम्न दुधनामध्ये १४.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

यंदाच्या उन्हाळ्यात धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या प्रकल्पांतील पाणीसाठा उणे टक्केवारीत गेला होता. त्यानंतर पावसाळ्यात सुरुवातीपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी राहिले. सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जेमेतेम १३.५० टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. 

या धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु चाऱ्या वितरिकांची कामे रखडली आहेत. उजव्या कालव्याचे कामदेखील अपूर्ण आहे. त्यामुळे या प्रकल्पाव्दारे अद्याप पूर्ण सिंचन क्षमता निर्माण झालेली नाही. गेल्या काही वर्षांत विशेषतः दुष्काळी वर्षात हे धरण भरले होते. त्यामुळे सेलू, जिंतूर, परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी आवर्तने सोडण्यात आली होती. उपसा सिंचन योजनांसाठी देखील पुरेसे पाणी उपलब्ध झाले होते. यंदा इतर सर्व प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आवर्तने मिळतील. परंतु निम्न दुधना प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे सिंचन आवर्तनाची शक्यता मावळली आहे.  

प्रकल्पातील तुलनात्मक उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
प्रकल्प २०१८  २०१९
जायकवाडी  २८.१० १००
येलदरी  ८.६१ १००
माजलगाव १००
सिध्देश्वर ०.७७  ९९.८०
निम्न दुधना १४.५४ १३.४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com