पुनर्विकासात अडत्यांच्या सूचनांचा विचार करू

पुनर्विकासात अडत्यांच्या सूचनांचा विचार करू
पुनर्विकासात अडत्यांच्या सूचनांचा विचार करू

पुणे ः पुणे बाजार समितीमधील फळे आणि भाजीपाला विभागाच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पासंदर्भात बाजार समिती प्रशासन आणि अडते असोसिएशनमध्ये बुधवारी (ता. १९) झालेल्या बैठकीत अडत्यांनी पूर्वीच्याच प्रकल्पाला पुन्हा विरोध केला. त्यात काही अटी, शर्तीनुसार पुनर्विकास करण्याची मागणी केली. अडत्यांच्या सूचनांचा विचार करून, प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन समितीने दिले. या संदर्भात सोमवारी (ता. २४) अडत्यांची सर्वसाधारण सभेत भूमिका जाहीर केली जाणार आहे.

बाजार समितीमधील भाजीपाला, फळे विभागाची इमारत ४० वर्षे जुनी आहे. बाजार समिती प्रशासनाने आत्तापर्यंत या विभागातील गाळ्यांचे दोन ते तीन वेळा स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. त्यातील इमारती धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला होता. तत्कालीन प्रशासकीय मंडळाने सुमारे ७५० कोटी रुपयांचा भाजीपाला, फळे विभागाचा पुनर्विकासाचा प्रकल्प तयार केला. प्रकल्प उभारण्यासाठी अडत्यांकडे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रत्येक अडत्याने गाळ्यांच्या बांधकामापोटी सुमारे ५० लाख रुपयांची रक्कम बाजार समितीला द्यावी, असे समितीकडून सुचविले होते. मात्र, त्या प्रस्तावाला अडत्यांनी विरोध केला. त्यानंतर या प्रस्तावाचा मुद्दा बाजूला पडला. 

बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी या प्रकल्पास चालना देण्यास सुरवात केली. त्याबाबत अडत्यांसोबत बाजार समिती प्रशासनाची बुधवारी (ता. १९) बैठक झाली. या बैठकीत अडत्यांसमोर पूर्वीच्याच प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याला अडत्यांनी विरोध केला. आता त्यामुळे पुनर्विकासाच्या मान्यतेसाठी बाजार समितीने अडत्यांच्या कोर्टात बॉल टाकला आहे. 

फळे भाजीपाला विभागाच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत अडत्यांसोबत चर्चा करण्यात आली. पुनर्विकासाचा जुनाच आराखडा आम्ही दाखवला. त्यात अडत्यांनी काही सूचना सुचविल्या आहेत. त्या सूचनांनुसार बदल करण्याच्या सूचना वास्तुविशारदना दिल्या आहेत. त्यानंतर पुन्हा आराखड्याबाबत चर्चा होईल. याबाबत अडत्यांची बैठक होऊन त्यात ते निर्णय घेतील, असे बाजार समितीचे प्रशासक  बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

बाजार समिती प्रशासनाने आम्हाला पूर्वीचाच आराखडा सादर केला. त्याला आम्ही विरोध केला. आमच्या ज्या अटी, शर्ती आहेत, त्या बैठकीत मांडण्यात आल्या. काही बदल आम्ही सुचविले आहेत. सर्वसाधारण सभेत पुनर्विकासाबाबत अंतिम निर्णय घेतल्यानंतरच भूमिका जाहीर करू, असे ठरले आहे. येत्या सोमवारी (ता. २४) आम्ही सर्वसाधारण सभा घेणार आहोत. त्यानंतर निर्णय घेऊ. - विलास भुजबळ, अध्यक्ष, अडते असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com