जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करू : ठाकरे

पंढरपूर, जि. सोलापूर : ‘‘कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया’’, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
Let's fight Corona by working responsibly: Thackeray
Let's fight Corona by working responsibly: Thackeray

पंढरपूर, जि. सोलापूर : ‘‘कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जिवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे. या पुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया’’, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. 

आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांचे पंढरपुरात आगमन झाले. त्या वेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. या वेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या. ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज, याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या, खासगी दवाखान्यांतून लस घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिक भर द्यावा.’’  

कोविड झालेल्या रुग्णांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करा. म्युकरमायकोसिसबाबत सतर्कता बाळगा. औषधाचा पुरेसा साठा, इंजेक्शनची कमतरता पडणार नाही, याचीही काळजी घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या. ठाकरे  यांना शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, ऑक्सिजन, लसीकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. 

  सोलापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावणार

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी दुहेरी पाइपलाइनसाठी अजून १०३ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर ठाकरे यांनी पाण्याचा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com