संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बारामती, इंदापूरमध्ये हलक्या पावसाची हजेरी

पुणे  : पावसाची प्रतीक्षा असलेल्या बारामती, इंदापूर तालुक्यांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. शिरूर, पुरंदरमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी दखलपात्र सरी बरसल्या असून, दौंडमध्ये मुख्यत: पावसाची उघडीप होती. पश्‍चिम भागात मात्र पावसाची संततधार सुरूच असल्याचे चित्र आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची रिपरिप कायम आहे.

जिल्ह्यातील पश्‍चिम भागात जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पावसाची संततधार सुरू आहे. मावळ पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मात्र पूर्वेकडे पावसाचा जोर कमी असून, दुष्काळी पट्ट्यात मुख्यत: पावसाची उघडीप अाहे. या भागात दिवसभरात एखाद दुसरी सर पडत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये बारामती आणि इंदापूर तालुक्यात २ ते १० मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. शिरूर आणि पुरंदरमध्ये एक ते दोन ठिकाणी दखलपात्र पाऊस पडला आहे. या पावसाने परेणी झालेल्या बाजरी व इतर खरीप पिकांना फायदा होणार आहे. पश्‍चिम भागातील मुळशी, मावळ, भोर, वेल्हा, जुन्नर तालुक्याच्या मावळ पट्ट्यामध्ये पावसाची रिपरीप सुरू असल्याने अनेक ठिकाणी ३० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी झालेला पाऊस (मिमी) : घोटावडे ३२, माले ४५, मुठे ३६, भोलावडे ९५, काले ६२, कार्ला ६४, खडकाळा ३२, लोणावळा ५०, पानशेत ३३, राजूर ४७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com