खानदेशातील काही भागांत हलका पाऊस

खानदेशातील काही भागांत हलका पाऊस
खानदेशातील काही भागांत हलका पाऊस

जळगाव : खानदेशात धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, जळगावमधील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार भागात आठवडाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. हलक्‍या, मुरमाड जमिनीच्या क्षेत्रात पिकांना पावसाची नितांत गरज आहे. शुक्रवारी (ता.१२) काही भागांत हलका व तुरळक पाऊस झाला. 

पेरणी झालेल्या शेतात उगवण बऱ्यापैकी झाली. काही भागांत आंतरमशागतही झाली; परंतु आता पावसाची प्रतीक्षा आहे. जळगाव जिल्ह्यात बोदवड, जामनेर, पाचोरा, जळगाव, धरणगाव, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव या भागात अनेक ठिकाणी हलकी, मुरमाड जमीन आहे. या जमिनीत दर दोन दिवसाआड पाऊस आला, तरी पिके जोमात असतात; परंतु आठवडाभर पावसाची उघडीप राहिली, तर पिकांना पाण्याचा ताण पडतो. पिके वाढीच्या अवस्थेत असून, खते दिली आहेत. त्यावर पावसाची आवश्‍यकता आहे. 

शुक्रवारी सायंकाळी जळगाव, धरणगाव, चोपडा, भुसावळ, जामनेर, एरंडोल या भागात तुरळक पाऊस झाला. शनिवारी (ता.१३) सकाळी आठपर्यंत झालेल्या नोंदीनुसार जळगावात पाच, धरणगावात चार, एरंडोलात पाच, भुसावळात चार मिलिमीटर पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या १९ टक्के पाऊस झाला. धुळ्यातही सरासरीच्या १७ टक्के; तर नंदुरबारात २१ टक्के पाऊस झाला आहे. 

धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, धुळे भागात हलकी, मुरमाड जमीन अधिक आहे. नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा भागातही पावसाची गरज आहे. 

खानदेशात तापीकाठी काळी कसदार जमीन आहे. मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, जळगाव, अमळनेर, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबार या तालुक्‍यांमधून तापी नदी जाते. या नदीकाठी काळी कसदार जमीन व पाण्याची सुविधा असल्याने या क्षेत्रातील पिकांची स्थिती बरी आहे. पाण्याचा फारसा ताण या भागातील पिकांना नसल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com