खानदेशात काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरी

खानदेशात काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरी
खानदेशात काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरी

जळगाव ः खानदेशात गेल्या २४ तासांत अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. अनेक भागांत पाच मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला. सध्या मूग काढणी सुरू असून, त्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची भीती आहे. 

ऊन-सावलीचे वातावरण मागील चार ते पाच दिवसांपासून आहे. यातच दुपारच्या वेळेस अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठवाजेपर्यंत (गेल्या २४ तासांत) अनेक भागांत पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात जामनेर, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, बोदवड, भुसावळ, चोपडा, यावल येथे पाऊस झाला. तर धुळे जिल्ह्यात साक्री, शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा येथे पाऊस झाला. अतिवृष्टी कुठेही झाली नाही. 

सध्या गिरणा, वाघूर, पांझरा, तापी नदीकाठच्या काळ्या कसदार शेतात मूग काढणी सुरू आहे. वाफसा हवा तसा नाही. आर्द्रतायुक्त वातावरण आहे. यातच मध्येच हलक्‍या सरी येत असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या वातावरणात शेंगा, दाण्यांचा दर्जाही हवा तसा राखणे कठीण होत आहे. पण पावसाच्या भीतीने काढणी सुरूच आहे. काढणीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण हवे आहे. उडीदही पक्व झाला आहे. त्याची कापणी, मळणी यासंबंधी कोरड्या वातावरणाची गरज आहे. 

ज्वारी, बाजरी, मका निसवले आहे. कणसे भरत आहेत. सोयाबीनच्या शेंगा पक्व होत आहेत. कोरडवाहू कापसामध्ये काळ्या कसदार जमिनीत आंतरमशागती करणे सध्या वाफसा नसल्याने शक्‍य होत नसून, किमान आठवडाभर कोरडे वातावरण हवे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वहंगामी व कोरडवाहू कापूस पिकात अनेक भागांत तण वाढले आहे. ते नियंत्रणासाठी चांगला वाफसा हवा आहे. परंतु वाफसा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाइलाजाने तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. 

गेल्या २४ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव ः एरंडोल सात, पाचोरा पाच, जळगाव सात. धुळे - साक्री नऊ, शिरपूर पाच. नंदुरबार - अक्कलकुवा ११, तळोदा  पाच.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com