अतिदुर्गम माळवाडी, धानवली गावांना लवकरच वीज जोडणी

अतिदुर्गम माळवाडी, धानवली गावांना लवकरच वीज जोडणी
अतिदुर्गम माळवाडी, धानवली गावांना लवकरच वीज जोडणी

पुणे : ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे ४ हजार ७५० फूट उंचीवर वसलेल्या माळवाडी व धानवली (ता. भोर) या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीज यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. १०० वीज खांब व एक रोहित्र उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले अाहे. लवकरच या गावांतील ४५ घरांना नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. 

भोरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम व सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत, घनदाट जंगल, वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नसलेल्या या गावांत गेल्या अडीच महिन्यांपासून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. खोल दऱ्या, दाट झाडी, उंच सुळके व आडवळणीचा घाट अशा अत्यंत दुर्गम व ११ किलोमीटर अखंड असलेल्या रायरेश्वर पठारावर रायरी ग्रामपंचायतीअंतर्गत माळवाडी हे १० घरांचे गाव आहे. त्यापुढे अडीच किलोमीटरवर धानवली हे स्वतंत्र ग्रामपंचायतीचे ३५ घरांचे गाव आहे. रायरेश्वर पठारावरील माळवाडी येथे जाण्यासाठी ३०० फूट उंचीचा कातळ कडा लोखंडी शिडीच्या साहाय्याने चढावा लागतो. तेथून धानवली गावात जाण्यासाठी २३५ फुटाचा कातळ कडा उतरावा लागतो. अशा स्थितीत वीजखांबांसह इतर विद्युत साहित्य खांद्यावर वाहून नेण्यात येत आहे. 

या गावांसाठी जिल्हा नियोजन विकास समितीने ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता केशव काळुमाळी, सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्यासह भोर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, महावितरणचे कर्मचारी विद्युतीकरणासाठी प्रयत्न करत आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या गावांच्या विद्युतीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या वीज यंत्रणेचा आढावा घेतला. ही दोन्ही गावे लवकरच प्रकाशमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com