हवामान बदलाच्या समस्येसाठी अन्न, आहार पद्धती बदलण्याची गरज

सॅण्टा बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत आपले निष्कर्ष ‘जर्नल सायन्स’ मध्ये प्रकाशित केले आहेत.
To limit global warming, the global food system must be reimagined...
To limit global warming, the global food system must be reimagined...

जागतिक पातळीवरील तापमान वाढ मर्यादित ठेवण्यासाठी जागतिक अन्न व आहार पद्धतीवर अधिक काम करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. सॅण्टा बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी कृषी क्षेत्रातून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत आपले निष्कर्ष ‘जर्नल सायन्स’ मध्ये प्रकाशित केले आहेत. खनिज इंधनाच्या ज्वलनामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. ते कमी करण्यासाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत. पॅरिस हवामान करारानुसार जागतिक तापमानातील वाढ ही औद्योगिक पूर्व पातळीपेक्षा १.५ ते २ अंशाने कमी राखण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे. मात्र, आजच्या क्षणापासून खनिज इंधनाचा वापर आपण थांबवला तरी जागतिक तापमान रोखण्यासाठी ते पुरेसे आहे का, असा प्रश्न करून सॅण्टा बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राचे प्रो. डेव्हिड टिलमन थांबत नाहीत. टिलमन आणि सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनामध्ये पेट्रोलियम ऊर्जा स्रोत हे संपूर्ण चित्राचा केवळ एक भाग असल्याचे स्पष्ट करतात. त्यांच्या मते, येत्या काही दशकातच एकूण हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचा विचार केल्यास जागतिक तापमानातील वाढ ही निर्धारित पातळीचा टप्पा ओलांडणार आहे. कारण हरितगृह वायूच्या उत्सर्जनाचा एक स्रोत आपली अन्न उत्पादन, निर्मिती प्रक्रियाही आहे. टिलमन सांगतात, की जागतिक अन्नाची मागणी आणि हरितगृह वायू हे एकमेकाशी जोडलेले आहेत. लोकसंख्या वाढत असताना कृषी व अन्य अन्न उत्पादनाच्या आपल्या पद्धतीही बदलणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रातून होत असलेल्या कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि अन्य हरितगृह वायू उत्सर्जनांचे प्रमाण ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता २०५० पर्यंत कृषी क्षेत्रातील उत्सर्जनाची पातळीच १.५ टक्क्याची पातळी ओलांडणार आहे. अन्न उत्पादन आणि निर्मिती प्रक्रियेतील हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी वेगाने प्रयत्न करावे लागतील. कारण अन्न ही सर्वच सजीवांची गरज आहे. आपण खनिज इंधनाचे ज्वलन रोखू शकलो नाही तर १८८० पासून सरासरी एक अंश सेल्सिअसने वाढत असलेल्या जागतिक तापमानाला कसे रोखू शकणार? असा प्रश्न विचारतात. वाढणारी सागरी पातळी, सागरांचे आम्लीकरण, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास आणि अन्य विपरीत परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समस्येवरील उत्तरासाठी मुळापर्यंत जावे लागेल टिलमन यांनी सांगितले, की कृषी क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण सुमारे ३० टक्के असल्याचे सर्वज्ञात आहे. शेतीसाठी होणारी जंगलांची तोड, जमिनींचे सपाटीकरण, खतांचा वापर आणि पशुपालन यांचे प्रमाण वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत जाणार आहे. अमेरिकेसारख्या अधिक उत्पादनक्षम विकसित देशांमध्येही विस्तीर्ण क्षेत्रावर सलग होणारी शेती, मोठमोठी प्रचंड यंत्रे, व्यावसायिक पशुपालन यासोबतच रासायनिक खतांचा होणारा मोठा वापर या बाबी हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये मोठा हिस्सा आहेत. तर कृषी क्षेत्रामध्ये अल्पउत्पादक असलेल्या सबसहारण आफ्रिकेसारख्या देशामध्ये वाढती लोकसंख्या, अन्नाची मागणी आहे. या सर्व भागातील शहरी क्षेत्रामध्ये मांस आणि मांसजन्य उत्पादनांचीही मागणी वेगाने वाढत आहे. ज्या वेगाने ही मागणी वाढत आहे, त्या तुलनेमध्ये शेतकरी उत्पादन वाढवू शकणार नाहीत. उत्पादकता कमी असल्याकारणाने नवीन क्षेत्र लागवडीखाली आणण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. आपण सर्व सजीव खाणे थांबवू शकत नाही, त्यामुळे कृषी क्षेत्रातून होणाऱ्या उत्सर्जनाकडे खनिज इंधनाच्या तुलनेमध्ये कमी लक्ष दिले जाते. कृषी क्षेत्र हे एकाच वेळी आहार, पर्यावरण आणि आरोग्य अशा तिन्ही घटकांशी जोडलेले आहे. या तिन्ही बाबी समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कृषीक्षेत्रावरही जागतिक तापमान वाढीचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येऊ लागले आहेत. अशा टप्प्यावर पिकांच्या उत्पादनवाढीसोबतच उत्सर्जन कमी राखण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्या आहार पद्धती उपयुक्त ? कमीत कमी उत्सर्जन असलेल्या आहारपद्धतीकडे लोकांनी लवकर वळले पाहिजे. त्यातून लोकांच्या भुकेचा प्रश्न सोडवण्यासोबतच तापमानातील वाढ २ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे शक्य होईल.

  • बहुतांश लोकांच्या आहारामध्ये वनस्पतिजन्य घटकांचे प्रमाण वाढले पाहिजे. हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही चांगले ठरणार आहे. टिलमन यांच्या मते, आहारामध्ये मांसाचे प्रमाण कमी करणे म्हणजे लाल मांस (रेड मीट) यांचे प्रमाण कमी करणे होय. नियमित लाल मांस आहारामध्ये घेणाऱ्या व्यक्तींनी ते आठवड्यातून एक वेळ घ्यावे. किंवा इतकीच प्रथिने चिकन, मासे, फळे, भाज्या यातून मिळवावीत. यातून पृथ्वीवरील वातावरण दीर्घकाळपर्यंत थंड ठेवण्यास मदत होईल.
  • बीफ आणि अन्य रवंथ करणाऱ्या प्राण्यांचे मांस यांचा आहारातील वापर कमी केल्यास मागणी कमी होईल. एकूणच त्यांच्या चरण्यासाठी कुरणे, चारा पिकाखालील क्षेत्रे, मक्यासह विविध धान्ये यांचा शेतीवरील ताण कमी होईल. कारण अधिक शेती म्हणजेच अधिक खते आणि अधिक प्रदूषण हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
  • शेतीमध्ये पिकांचे अधिक उत्पादन घेण्याच्या उद्देशाने १९६० नंतर बहुतांश देशामध्ये खतांचा वापर अधिकाधिक वाढत गेला. हा असंतुलित वापर खरेतर अनावश्यक आहे. अत्यंत अचूकपणे खतांचा मुळांजवळ वापर केल्यास खतांच्या वापरामध्ये जागतिक पातळीवर ३० टक्क्याने घट करणे शक्य होईल. यातून शेतकऱ्यांच्या खर्चात बचत साधेल. खतांच्या ऱ्हासातून उत्सर्जित होणारे नायट्रस ऑक्साईड सारखे हरितगृह वायू कमी होतील. भविष्यातील कृषी क्षेत्रातील होणाऱ्या उत्सर्जनातील सुमारे ४० टक्के भाग याच वायूतून येण्याची शक्यता आहे.
  • सध्याचे जागतिक पातळीवरील प्रति व्यक्ती ऊर्जा (कॅलरी) वापर हा गरजेपेक्षा अधिक आहे. तो आरोग्यदायी पातळीवर आणणे आवश्यक आहे. यामुळे एकाच वेळी स्थौल्यत्वाची आणि भुकेची समस्या कमी करता येईल. अन्नधान्याची मागणी कमी राहिल्याने शेतजमिनींवरील उत्पादनाचा ताण कमी करता येईल. वाया जाणारे अन्न अर्ध्याने कमी होऊ शकेल.
  • एकाच वेळी अन्नाची उपलब्धता आणि पर्यावरणाची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सर्वशक्य प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक आवश्यक धोरण त्यासाठी राबवले गेले पाहिजे. संपूर्ण बदल एकाच वेळी होईल, या अपेक्षेने थांबून चालणार नाही. हा एका किंवा दोन देशांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनाचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने याकडे पाहावे लागेल. - प्रो. डेव्हिड टिलमन, कॅलिफोर्निया विद्यापीठ.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com