शेतकऱ्यांचे ऐकण्यासाठीच बांधावर ः कृषी राज्यमंत्री रुपाला

शेतकऱ्यांचे ऐकण्यासाठीच बांधावर ः कृषी राज्यमंत्री रुपाला
शेतकऱ्यांचे ऐकण्यासाठीच बांधावर ः कृषी राज्यमंत्री रुपाला

केडगाव, जि. पुणे ः ‘‘शेतकऱ्यांच्या मनातील ऐकण्यासाठीच बांधावर आलो आहे. शेतकऱ्यांना फायदेशीर वाटत नसणाऱ्या योजनांबाबत शेतकऱ्यांनी जर सरकारकडे नाराजी व्यक्त केली तर अशा योजना बंद करण्यात येतील,’’ असे वक्तव्य केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी भांडगाव (ता. दौंड) येथे केले. येथे भाजपने आयोजित केलेल्या ‘किसान की मन की बात’ या कार्यक्रमात रुपाला बोलत होते. 

या वेळी किसान मोर्चाचे वासुदेव काळे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी उपसंचालक विजयकुमार कानडे, बाबासाहेब चवरे, तात्या ताम्हाणे, गणेश आखाडे, सुभाष डाबी, महेश रूपनवर उपस्थित होते. 

रुपाला म्हणाले, ‘‘देशातील शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा असणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत. सरकारने उत्पन्नवाढीसह नफा वाढला पाहिजे यावर भर दिला आहे.’’

पाशा पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वासुदेव काळे म्हणाले, ‘‘२०१९च्या भाजप निवडणूक जाहीरनाम्यात कृषीसाठी काय तरतुदी असाव्यात हे जाणून घेण्यासाठी रुपाला येथे आले आहेत. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सुचवलेल्या प्रमुख सूचना भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात असणार आहेत.’’

या वेळी आनंद चोरडिया, चंद्रकांत नागवडे, राम शिंदे, समीर डोंबे, बाबासाहेब चवरे, बापूराव दिवेकर, राजेंद्र खोमणे, धनंजय आटोळे, रामचंद्र निंबाळकर, जगन्नाथ रसाळ, लालासाहेब दळवी, विलास कुटे, शंकर राऊत यांनी जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळावे, कर्जमाफी, अनुदान नको तर हमीभाव द्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, शेतकऱ्यांना निर्यातीचे शिक्षण द्यावे, गरजे इतकी साखर बनवावी व इतर उसाचे इथेनॉल बनवावे, सूक्ष्म इरिगेशनसाठी कमी दरात कर्ज व साहित्य मिळावे, अशा मागण्या केल्या.

शेतकऱ्यांच्या सूचना शेतकऱ्यांनी शेती प्रक्रिया उद्योग उभारावेत, शेतीमाल साठवण केंद्र हवी, रेशीम कोशाची खरेदी-विक्री राज्यात होऊन कोषाला अनुदान मिळावे, जैविक शेती वाढण्यासाठी शेतकरी गटांची स्थापना व्हावी, विक्री केंद्र व्हावे, सेंद्रिय बीज उत्पादन केंद्रे उभारावीत, पशुखाद्याचे दर कमी करावेत, डाळिंबावरील मर रोग व तेल्या रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, दुधाला अनुदान द्यावे, किसान तक्रार निवारण समिती गावापासून जिल्हा पातळीवर बनवावी, साखर कारखान्यांवरील वजनकाट्यांची तपासणी नियमित व्हावी, अशा सूचना मांडल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com