साखर कारखान्यांचे ४०० कोटींचे कर्जप्रस्ताव अडकले

साखर कारखाने
साखर कारखाने

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना ४०० कोटींचे सॉफ्टलोन देण्यात अडथळे आल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय राज्य सहकारी साखर कारखाने संघाने घेतला आहे. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, “राज्यातील शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना निधी हवी आहे. केंद्र सरकारने त्यासाठी सॉफ्टलोन योजना आणली. मात्र, उणे ‘एनडीआर’ (नेट डिस्पोजेबल रिसोर्सेस) श्रेणीत कारखाने असल्याचे कारण दाखवून कर्ज मंजूर केलेले नाही. काही अटी असल्या तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी नियम शिथिल करावेत, अशी मागणी आम्ही केली आहे.” कर्ज उचलण्याची मुदत ३१ मे रोजी समाप्त झाली आहे. मात्र, कारखान्यांना लाभ न मिळाल्याने अट वाढवून देण्याचीदेखील मागणी साखर संघाने केली आहे. राज्यात २७०० कोटींची एफआरपी थकलेली आहे. सॉफ्टलोन मिळाल्यास २७०० कोटी रुपये उपलब्ध होतील. २० कारखान्यांना जिल्हा बॅंकांकडून ३५३ कोटी रुपये कर्ज मिळाले आहे. मात्र, शिखर बॅंकेने २७ कारखान्यांचे ४१९ कोटी रुपयांच्या आसपास कर्जप्रस्ताव मंजूर केलेले नाहीत. संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात उच्चांकी साखर उत्पादन आणि कमी साखरेचा खप अशी स्थिती असताना काही कारखान्यांची खाती एनपीएकडे झुकलेली आहेत. त्यामुळे शासनाने थकहमी देण्याची अट बॅंकांनी टाकली आहे. काही जिल्हा बॅंकांनी कर्ज कारखान्यांना कर्ज मंजूर केले तर राज्य सहकारी बॅंक मात्र कर्ज वितरित करीत नसल्याने विषमता तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे साखर संघाचे म्हणणे आहे. दरम्यान, या समस्येची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री, शिखर बॅंकेचे अध्यक्ष तसेच साखर आयुक्तांची भेट घेण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. कर्जप्रस्ताव नाबार्डकडे सुपूर्त राज्यातील साखर कारखान्यांच्या कर्जप्रस्तावांची माहिती शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी काळजीपूर्वक समजावून घेतली आहे. नाबार्डच्या सूचनेनुसार उणे ‘एनडीआर’ असलेल्या कारखान्यांचे सर्व कर्जप्रस्ताव नाबार्डकडे सोपविण्यात आले आहेत. या समस्येशी शिखर बॅंकेचा काहीही संबंध नाही, असा निर्वाळा बॅंकेने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com