‘शेतमाल तारण’अंतर्गत साडेआठ कोटींचे कर्जवाटप

‘शेतमाल तारण’अंतर्गत साडेआठ कोटींचे कर्जवाटप
‘शेतमाल तारण’अंतर्गत साडेआठ कोटींचे कर्जवाटप

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजनेअंतर्गत ७९५ शेतकऱ्यांना ८ कोटी ६० लाख ९० हजार ५४३ रुपये एवढे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी विविध प्रकारचा एकूण ४५ हजार ३६९ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. या संदर्भात राज्य कृषी पणन मंडळाच्या सूत्रांनी माहिती दिली.

खुल्या बाजारातील शेतमालाच्या दरात घसरण होते. त्या वेळी शेतमालाची विक्री केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवून कर्ज घेता येते. बाजारभावात सुधारणा झाल्यानंतर तारण ठेवलेल्या शेतमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्या दृष्टीने राज्य कृषी पणन मंडळातर्फे कृषी उत्पन्न बाजार समित्याअंतर्गत शेतमाल तारण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत तारण शेतमालाच्या चालू बाजार भावानुसार होणाऱ्या किमतीच्या ७५ टक्के रक्कम कर्ज ६ टक्के व्याज दराने १८० दिवस कालावधीसाठी दिले जाते.

शेतमाल तारण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १९ पैकी ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, परभणी जिल्ह्यातील ११ पैकी ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, हिंगोली जिल्ह्यातील ७ पैकी ३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना तारण कर्जवाटप केले आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, नायगाव, देगलूर, धर्माबाद, कुंडलवाडी, हदगांव, माहूर, किनवट या ८ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजनेअंतर्गत ४५८ शेतकऱ्यांना एकूण ४ कोटी ६८ लाख ९८ हजार ५१ रुपये कर्जवाटप केले आहे. त्यासाठी विविध प्रकारचा एकूण २८ हजार ६५५ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. या शेतमालाची किंमत ९ कोटी ८ लाख १६ हजार १७४ रुपये एवढी होते. या संदर्भात राज्य कृषी पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पृथ्वीराज मनके यांनी माहिती दिली.

परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी या ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एकूण २२७ शेतकऱ्यांना २ कोटी ८९ लाख ८५ हजार ७०२ रुपये शेतमाल तारण कर्जवाटप केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, हरभरा, हळद मिळून एकूण १२ हजार १७५ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ३ कोटी ९३ लाख ६० हजार १४१ रुपये एवढी होते. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार या ३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी एकूण ८० शेतकऱ्यांना १ कोटी २० लाख ६ हजार ७९० रुपये एवढे कर्जवाटप केले आहे. त्यासाठी या शेतकऱ्यांचा हळद, सोयाबीन मिळून एकूण ४ हजार ५३८ क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. तारण शेतमालाची किंमत १ कोटी ५४ लाख ८१ हजार ५५४ रुपये एवढी होते. या संदर्भात पणन मंडळाचे जिल्हा प्रतिनिधी पंकज चाटे यांनी माहिती दिली.

शेतमाल तारण कर्जवाटप जिल्हानिहाय स्थिती (कोटी रुपये)
जिल्हा बाजार समिती संख्या शेतकरी कर्ज रक्कम
नांदेड ४५८ ४.६८९८                
परभणी २५७ २.८९८५
हिंगोली ८० १.०२०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com